
एका व्यक्तीद्वारे लहान मुलाला अमानुष आणि निर्दयीपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ हरिद्वारच्या एका अनाथ आश्रमातील आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सीतापूरमधील एका संस्कृत शाळेचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये व्यक्ती क्रूरपणे लहान मुलाला चापट, छडी व लाथा-बुक्याने मारताना आणि जमिनीवर आपटताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅपशनमध्ये लिहितात की, “हरिद्वार चे एक अनाथ आश्रम !”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ हरिद्वारातील आश्रमाचा नाही.
हा व्हिडिओ हरिद्वारच्या आश्रमाचा नसून उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील एका संस्कृत शाळेचा आहे.
दैनिक भास्करने 8 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसारीत केलेल्या एका बातमीमध्ये व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
सोबत दिलेल्या महितीनुसार ही घटना सीतापूरमध्ये घडली होती. जिथे एका संस्कृत शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला अशा प्रकारे मारहाण केली होती.
मूळ पोस्ट – दैनिक भास्कर | आर्काइव्ह
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, ही घटना उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील सिधौली तालुक्यामधील छाजन गावात घडली होती.
व्हिडिओमधील पीडित मुलाचे नाव दीपक असून तो गुरुकुलमध्ये (संस्कृत शाळा) शिकत असताना एका क्षुल्लक कारणावरून आचार्य सतीश यांनी त्याला बेदम मारहाण केली होती. अधिक महिती येथे वाचू शकता.
खोटा दावा !
हाच व्हिडिओ 2023 मध्ये खोट्या दाव्यासह व्हायरल झाल्यावर सीतापूर पोलिसांनी याबाबत स्पष्ट केले की, ही घटना छाजन गावातील गुरुकुलमध्ये घडली होती. विद्यार्थी दीपकला मारहाण करणारे आचार्य सतीश जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.
तसेच फॅक्ट क्रेसेंडोने सिधौली पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यावर तेथील ठाणेदार आर.के. सिंह यांनी सांगितले की, हा व्हिडिओ हरिद्वारातील आश्रमाचा नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये विद्यार्थाला अमानुषपणे मारहाण प्रकरणी शिक्षक सतीश जोशी विरोधात एफआयआर नोंदवत त्याला अटक करण्यात आली.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ हरिद्वारातील आश्रमाचा नाही. मुळात 2023 मध्ये सीतापूरमधील एका संस्कृत शाळेतील शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण होती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:हा व्हिडिओ हरिद्वारच्या अनाथ आश्रमात लहान मुलाला मारण्याचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Altered
