
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती पोलिस अधिकाऱ्यासोबत मारहाण करताना दिसतो.
जावा केला जात आहे की, हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा असून आमदार मोहम्मद दिमीर यांनी पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असून पश्चिम बंगालशी संबंधित नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पोलिस आधिकाऱ्याला मारहाण करताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पश्चिम बंगाल मध्ये पोलिसच असुरक्षित… आमदार मोहम्मद दिमीर याची पोलिस अधिकाऱ्याला जबर मारहाण.”
मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह | फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर ‘मोहम्मद दिमीर’ नामक कोणत्याही आमदाराची माहिती समोर आली नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना 6 वर्षांपूर्वी घडली होती.
एनआयएने 20 ऑक्टोबर 2018 रोजी हाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “भाजप नगरसेवक मनीषने एका उपनिरीक्षकाला मारहाण केली. उपनिरीक्षक एका महिला वकिलासह मनीषच्या हॉटेलमध्ये आल्यावर वाद झाला आणि नगरसेवकाला अटक करण्यात आली.”
काय आहे पूर्ण प्रकरण ?
उत्तर प्रदेशामधील मेरठ शहरात ऑक्टोबर 2018 मध्ये व्हिडिओमधील पोलिस उपनिरीक्षक सुखपाल पनवार एका महिला वकिलासोबत भाजप नेते मनीष चौधरी यांच्या रेस्टॉरंटमध्ये आले.
जेवण वेळेवर न दिल्याने महिलेचा वेटरशी वाद झाला. पुढे मनीष चौधरी आणि सुखपाल पनवार यांनी या वादात हस्तक्षेप केला. परंतु, हा वाद इतका चिघळत गेला की, चौधरी यांनी उपनिरीक्षकांचा गळा धरला आणि त्यांना मारहाण केली.
या घटनेनंतर डेप्युटी एसपी (दौराळा) पंकज कुमार सिंह आणि कंकरखेडा पोलिस स्टेशनचे प्रभारी विनय कुमार आझाद रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यांनी वकील आणि अधिकाऱ्याला पोलिस स्टेशनला नेले.
माध्यमांशी बोलतांना पंकज कुमार सिंग सांगतात की,”दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि अहवालात त्यांनी दारू प्यायल्याचे पुष्टी झाले. आम्ही नगरसेवकाला अटक केली आणि तुरुंगात पाठवले तर पोलिस अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून लाईन्समध्ये पाठवण्यात आले.” संपूर्ण महिती येथे व येथे वाचू शकता.
मूळ पोस्ट – इंडियन एक्सप्रेस
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असून पश्चिम बंगालशी संबंधित नाही. 2018 मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याला भाजप नेते मनीष चौधरी यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर भाजप नेत्याला अटक करण्यात आली आणि अधिकाऱ्याला पोलिस विभागाकडून शिक्षा करण्यात आली. खोट्या दाव्यासह पश्चिम बंगालशी जोडून हा जुना व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:भाजप नेत्याने पोलिसांना मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
