
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे की, एक महिला एका सरकारी कार्यालयासमोर स्वत:ला आग लावते आणि पोलिस कर्मचारी ती आग विझवून महिलेला वाहनात बसवतात.
दावा केला जात आहे की, लखनऊ विधानसभेसमोर एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना 4 वर्षांपूर्वीची आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला जळत असताना पोलिस कपड्याच्या साह्याने आग विझवतात आणि तिला वाहनात बसवताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “लखनौ विधानसभे समोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न… भाजपा कार्यालय.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे.
हिंदी नेट न्यूज या युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 13 ऑक्टोबर 2020 रोजी शेअर केल्याचे आढळले.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “लखनऊ विधानसभेसमोर एका महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले.”
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, स्वतःला पेटवून घेणाऱ्या महिलेले नाव अंजली तिवारी उर्फ आयशा असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांना अंजलीने सांगितले की, “पहिल्या पतीसोबतचे नाते संपवल्यानंतर मी धर्म आणि नाव बदलले होते आणि आसिफ रझा नावाच्या तरुणासोबत वेगळ्या घरात राहत होते. जेव्हा आसिफ सौदी अरेबियाला गेला तेव्हा मी त्याच्या घरी राहण्यासाठी गेली होते, परंतु आसिफच्या कुटुंबीयांनी मला त्यांच्या घरी ठेवण्यास नकार दिला होता. या प्रकरणी मला पोलिसांकडून मदत मिळाली नाही. तसेच लखनऊमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले. परंतु, यश काही मिळाल नाही. म्हणून मी लखनऊ विधानसभेसमोर आत्मदहनाचा निर्णय घेतला होता.”
या प्रकरणात लखनऊ पोलिसांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचा मुलगा आलोक प्रसाद याला ताब्यात घेण्यात आले. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आलोकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
लखनऊ पोलिसांचे खंडण
जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल झाल्यावर लखनऊ पोलिसांनी या दाव्याचे खंडण केले.
लखनऊ पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले की, “वरील व्हिडिओ 2020 सालचा असून यामध्ये हजरतगंज पोलिस स्टेशनने वेळेवर कारवाई केली होती.”
मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 4 वर्षांपूर्वीचा आहे. 2020 मध्ये लखनऊमधील विधानसभा मार्गावरील भाजप मुख्यालया समोर एका महिलेने रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याचा जुना व्हिडिओ सध्याची घटना म्हणून व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Partly False
