
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक कॅमेरे रस्त्यावर ठेवलेले दिसतात. सोबत पोस्टमध्ये लिहिले होते की, “हिंदुस्तान टाइम्सची रिपोर्टर अनुश्रीचा कॅमेरा हिसकावल्यावर आणि दुसऱ्या महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केल्यावर पत्रकारांनी पोलिस मुख्यालयासमोर आपले कॅमेरे रस्त्यावर ठेवत या घटनेचा निषेध केला.”
दावा केला जात आहे की, ही घटना नुकतीच घडली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आणि व्हायरल घटना आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो आणि घटना 7 वर्षांपूर्वीची आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये रस्त्यावर अनेक कॅमेरे ठेवलेले दिसतात.
हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिता की, “हिंदुस्तान टाइम्स ची रिपोर्टर अनुश्री काल ज़मिनीवर खाली पडलेल्या एका मुलाला बेरहम पणे मारणा-या पोलिसांचे फोटो काढत होती। जवळच उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने म्हंटले, “इसका कैमरा तोड़ दो” आणि मग अनुश्री चा कॅमेरा हिसकावून घेतला । एका दुसऱ्या महिला पत्रकार ला एका पोलिस अधिकाऱ्याने धक्का दिला आणि असं करतं असताना तिची छाती (वक्ष स्थळ) दाबली। नंतर पोलिसांनी असं स्पष्टीकरण दिले की त्या महिला पत्रकारांना तो पोलिस विद्यार्थीनी समजला होता. आता प्रश्न असा निर्माण होतो की एखाद्या विद्यार्थींनीची छाती दाबणे हा गुन्हा नाही आहे का ? जर नाही तर सरकारने याबाबत घोषणा केली पाहिजे, पोलिस मॅनुअल मध्ये या गोष्टी सामिल तर नाही केल्या ? फ़र्स्ट पोस्ट चा पत्रकार प्रवीण सिंह यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुसऱ्या अनेक पत्रकारांसोबत असंच काहीसं झालं आहे. हे सर्व कॅमेरे फ़ोटो जर्नलिस्टांनी पोलिस मुख्यालयाच्या समोर ठेवले आहेत. विरोध करताना काही फोटो बरंच काही सांगून जातात. कदाचित आता तरी “गोदी मिडिया” आत्मपरिक्षण करतील.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो आणि घटना 2018 मधील आहे.
द जनमंच न्यूजने 24 मार्च 2018 रोजी हाच फोटो आणि सोबत दिलेली घटना वेबसाईटवर शेअर केली होती.
अधिक सर्च केल्यावर 2018 मध्ये अनेक माध्यमांवर हिच बातमी शेअर केल्याचे आढळले.
द टेलीग्राफ इंडियाने या घटनेची माहिती देताना आपल्या बातमीत सांगितले की, 23 मार्च 2018 रोजी जेएनयूच्या काही विद्यार्थांनी व शिक्षकांनी संसदेकडे मोर्चा काढला होता. या मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी अनेक पत्रकार आले होते.
संसदेपासून 6 किमी अंतरावर हा मोर्चा पोलिसांद्वारे आडविण्यात आला होता. पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्यांवर लाठीमार केला आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली होती.
फर्स्टपोस्ट या वेब पोर्टलचे पत्रकार प्रवीण सिंग यांनादेखील पोलिसांनी मारहाण केली होती.
यामध्ये पुढे एक महिला पत्रकार सांगते की, दिल्ली कॅन्टोन्मेंट स्टेशन हाऊस ऑफिसर विद्याधर सिंग यांनी दोघांनाही दूर ढकलले. ‘आम्ही पत्रकार आहोत.’ असे सांगून दूर कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. त्या कोपऱ्यात दुसरे कोणीही नव्हते. दोन मिनिटांनी सिंग परत आला आणि त्याने असभ्य वर्तन केले होते.
या घटनेचा पत्रकारांनी विरोध केल्यावर पोलिस उपायुक्त (डिप्लोमॅटिक सिक्युरिटी फोर्स) कुमार ज्ञानेश यांनी इन्स्पेक्टर सिंग यांना माफी मागण्यास भाग पाडले होते.
हिंदुस्तान टाईम्सच्या छायाचित्रकार अनुश्री फडणवीस यांनी आरोप केला आहे की, या मोर्चादरम्यान एका विद्यार्थिनीला लाथ मारल्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना एका अधिकाऱ्याने माझा कॅमेरा हिसकावून घेतला आणि रात्री 9:30 वाजेपर्यंत तो परत केलाच नाही.
इंडिया टुडे आणि इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सने आपल्या वेबसाईटवर याच घटनेची हिच बातमी शेअर केली होती.
अनुश्री फडणवीसचे ट्विट
हिंदुस्तान टाईम्सचे फोटो एडिटर या घटनेची बातमी शेअर केल्यावर पत्रकार अनुश्री फडणवीस यांनी 23 मार्च 2018 रोजी रिट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “काम करताना दिल्लीतील महिला पोलिस अधिकाऱ्यांकडून मला मारहाण होईल असे कधीच वाटले नव्हते. माझा कॅमेरा हिसकावून घेण्यात आला आणि मला तो अजून मिळालेला नाही.”
दिल्ली पोलिसांची कारवाही
महिला पत्रकारांसोबत झालेल्या या घटनेचा पत्रकारांनी विरोध दर्शविला आणि पोलिस उपायुक्त (डिप्लोमॅटिक सिक्युरिटी फोर्स) कुमार ज्ञानेश यांनी इन्स्पेक्टर सिंग यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. तसेच 3 दिवसानंतर या प्रकरणात दोन कॉन्स्टेबलांना निलंबित करण्यात आले. अधिक महिती येथे व येथे पाहू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल घटना 7 वर्षांपूर्वीची आहे. 2018 मध्ये पत्रकार अनुश्री फडणवीस जेएनयूच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी काढलेला मोर्चा वार्तांकन करत असताना पोलिसांनी त्यांचा कॅमेरा हिसकावला होता. पत्रकारांच्या निषेधानंतर ज्या पोलिसाने दोन्ही महिला पत्रकारांसोबत अयोग्य वर्तन केले त्याला वरिष्ठांनी माफी मागायला लावली. तसेच या प्रकरणात दोन कॉन्स्टेबलांना निलंबित करण्यात आले.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:हिंदुस्तान टाइम्सची रिपोर्टर अनुश्रीचा कॅमेरा हिसकावल्याची घटना 7 वर्षांपूर्वीची; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Partly False
