महाराष्ट्राने नाही तर दिल्ली सरकारने महिलांसाठी बस न थांबविणाऱ्या चालकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला; वाचा सत्य

Government Missing Context

राज्यातील विद्यामान सरकारतर्फे महिलांसाठी विविध योजना (उदा. लाडकी बहिण योजना) लागू होत असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, रस्त्यावर एकटी महिला थांबलेली असता बस थांबविली नाही तर त्या बसचे चालक आणि वाहक (कंडक्टर) दोघांनाही निलंबित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर या कथित निर्णयचे स्वागत होत असून महिलांना पुरुषांपेक्षा झुकते माप दिले जात असल्याचा विनोदही केला जात आहे. काही युजर्स तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रणीत विद्यमान सरकारचेही अभिनंदन करीत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, सोशल मीडियावरील पोस्ट्स दिशाभूल करणाऱ्या आहेत. व्हायरल होत असलेला निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही.

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एकट्या महिलेला पाहून बस थांबवली नाही तर आता चालक, वाहकांचं थेट निलंबन; सरकारचा मोठा निर्णय.”

या पोस्टवरून असा समज होत आहे की, रस्त्यावर एकटी महिला असेल तर तिच्यासाठी बस थांबवावी लागेल. असे न करणाऱ्या बसचालक आणि वाहकांचे निलंबन करण्यात येईल.

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये टीव्ही-9 मराठी वाहिनीचा लोगो दिसतो. त्यानुसार शोध घेतल्यावर टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या वेबसाईटवर याच शीर्षकाची बातमी आढळली.

30 डिसेंबर रोजी प्रकाशित या बातमीत म्हटले आहे की, महिलांसाठी बस न थांबविणाऱ्या चालक आणि वाहकांना निलंबित करण्याचा दिल्ली सरकारने निर्णय घेतला आहे.

दिल्लीमध्ये महिलांसाठी बससेवा मोफत आहे. त्यामुळे काही बसचालक महिलांसाठी गाडी थांबवित नाहीत, अशा तक्रारी समोर येत आहेत.

मूळ बातमी – टीव्ही-9 मराठी

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये या निर्णयाची माहिती दिली होती. दिल्लीमध्ये महिलांसाठी बससेवा मोफत आहे. 

या मुद्याला अनुसरून मुख्यमंत्री आतिसी म्हणाल्या की, “सरकारला आणि मला व्यक्तिगत स्वरुपात अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, की दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) आणि कलस्टर बस चालक थांब्यावर जर केवळ महिला प्रवासीना असतील तर त्यांच्यासाठी गाडी थांबवित नाहीत. पण मी महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी मोठ्या संख्येनं बसमधून प्रवास करावा. जर चालक आणि वाहकांनी महिला प्रवाशांना पाहून बस थांबवली नाही तर संबंधित चालक आणि वाहकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असे जर कोणी करीत असेल त्वरीत त्या बसचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकावा. त्यांच्यावर त्वरीत कडक कारवाई केली जाईल.”

सविस्तर बातमी येथे आणि येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, महिलांसाठी बस न थांबविणाऱ्या चालक व वाहकांवर कारवाई करण्याचा हा निर्णय महाराष्ट्र सरकारचा नाही. असा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. तसेच हा निर्णय केवळ बसथांब्यावर महिला प्रवाशांसाठी बस थांबविण्याविषयी आहे. अर्थात काय तर, समाजमाध्यमांवरील पोस्ट संदर्भाविना शेअर केली जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:महाराष्ट्राने नाही तर दिल्ली सरकारने महिलांसाठी बस न थांबविणाऱ्या चालकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला; वाचा सत्य

Written By: Agastya Deokar  

Result: Missing Context