
छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा रोडवर तरसाने एका वृद्धवर हल्ला केला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे. 2021 मध्ये पुण्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात तरसाने दोन व्यक्तींवर हल्ला केला होता.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावरुन जात असताना एका ज्येष्ठ नागरिकावर तरस हल्ला करताना दिसतो. त्यांना वाचवण्यासाठी एक जण मग तरसला लाठीने मारून पळवून लावतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “2021 हायना (तरस) जटवाडा रोड औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)”
मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, तरसाच्या हल्ल्याची ही घटना 3 वर्षांपूर्वीची आहे.
बीबीसी न्यूज मराठीने हाच व्हिडिओ 8 सप्टेंबर 2021 रोजी युट्यूबवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “वन्य प्राणी तरसने (हायना) पुणेमध्ये एका वृद्धावर अचानक हल्ला केला.”
लोकसत्ताच्या बातमीनुसार हा हल्ला पुण्याच्या खेड तालुक्यामधील खारपुडी गावात झाला होता. तरसने या ठिकाणी दोन व्यक्तींना जखमी केले होते. पांडुरंग सहादू जाधव (70) यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. तर त्यांच्या मदतीसाठी धाऊन जाणारा दुचाकीस्वार राहुल मधुकर गाडे वय वर्ष 25 यांना उजव्या हाताला दुखापत झाली होती.
जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक जयरामेगौडा यांनी या घटनेची चैकशी केल्यावर सांगितले होते की, “ही घटना घडण्याआधी तेथे लोकांना तरसाचा वावर दिसून आला होता. हल्ला होण्याच्या काही मिनिटांपूर्वी वृद्ध व्यक्तीला त्या दिशेने जाऊ नका असे सांगितले होते. परंतु, ते गेले आणि त्यांच्यावर तरसाने हल्ला केला. या घटनेनंतर दोघांना शासकीय रुग्णालयात उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कोर्स देण्यात आला होता. तसेच हल्ला करणारा तरसने घटना स्थळावरुन पळ काढल्यानंतर त्याचा वाहनाशी धडक बसून मृत्यू झाला.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, तरसाने केलेल्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील नसून पुण्यातील खारपुडी गावातील आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पुण्यात तरसाने केलेल्या हल्ल्याचा जुना व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
