
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह त्यांना भेटायला आलेल्या एक महिलेला हाकलून लावताना दिसतात.
दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारामध्ये घोषणा केलेल्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत 8 हजार 500 रूपये मागण्यासाठी आलेल्या या महिलेल्या दिग्विजय सिंह यांनी हाकलवून लावले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, ही महिला काँग्रसची कार्यकर्ता असून ती महालक्ष्मी योजनेचे पैसे मागायला आली नव्हती.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला भेटायला आल्यावर दिग्विजय सिंह आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला हाकलवून लावले.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “8500₹ मागणाऱ्या महिलेला हाकलल दिग्विजयसिंह.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्या पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या असून त्या महालक्ष्मी योजनेची रक्कम मागत नव्हत्या.
हिंदुस्तानच्या बातमीनुसार हा व्हिडिओ 21 फेब्रुवारी रोजीचा आहे. व्हिडिओमधील महिलेचे नाव डॉ. लीना शर्मा असून त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत.
दिग्विजय सिंह ‘न्याय यात्रे’संदर्भात ग्वाल्हेर-चंबळ दौऱ्यावर आले असताना ते वरिष्ठ नेत्यांशी भेट घेत होते. तेव्हा लीना शर्मा त्यांना भेटायला पुढे आल्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले असताना त्यांनी वाद घालायला सुरुवात केली.
हे बघून दिग्विजय सिंह यांनी त्यांना बाहेर पाठवण्यास सांगितले. ही घटना घडल्यानंतर एडीटीव्ही, उमर उजाला आणि टीव्ही9 भारतवर्षने बातमी प्रकाशीत केली.
माध्यमांशी बोलताना डॉ. लीना शर्मांनी स्पष्ट केले की, “दिग्विजय सिंह यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे मला बाहेर घालवल्याचा माला राग आला नाही. ते माझ्या पालका समान आहेत.”
तसेच डॉ. शर्मांनी लोकसभा निवडणुकीत बनारसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध स्वत: लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
काँग्रेसने 5 एप्रिल रोजी सर्वप्रथम घोषणापत्रामध्ये महालक्ष्मी योजना जाहीर केली होती. याचा अर्थ की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ ही योजना घोषित होण्याच्याही दोन महिन्यांपूर्वीची आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील महिला काँग्रस नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळ महालक्ष्मी योजनेची रक्कम मागत नव्हती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:महालक्ष्मी योजनेची रक्कम मागणाऱ्या महिलेला दिग्विजय सिंह यांनी हाकलले का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Missing Context
