बिहारच्या युवकाने गुगल हॅक केल्यावर त्याच कंपनीने त्याला 3.66 कोटीचे पॅकेज दिले का ? वाचा सत्य

False Social

बिहारच्या ऋतुराज चौधरी युवकाने नामक गुगल इंजिन हॅक केल्यानंतर त्याला गुगलने 3.66 कोटी रूपयांचे पॅकेज देत नोकरी दिली. असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा आहे. ऋतुराज चौधरीला गुगलने कोणतेही पॅकेज देत नोकरी दिली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, “ऋतुराज चौधरीने गुगल इंजिन हॅक केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांला मेल केला की ‘आम्ही तुझ्यातील गुणवत्तेला सॅल्यूट करत आहोत. कृपया तू आमच्यासोबत काम कर. ऋतुराज चौधरीला ‘जॉईनींग लेटर ‘ देत ३.६६ कोटी रूपयांचे पॅकेज दिले. ऋतुराज जवळ पासपोर्ट नव्हता तर गुगलने भारत सरकारशी विस्तृत चर्चा केली आणि पासपोर्ट तयार करून त्याच्या घरी पोहोचता केला. आता प्रायव्हेट जेट विमानाने अमेरीकेला रवाना होईल.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल मेसेज 2022 पासून सोशल मीडिवर उपलब्ध आहे.

 टाईम्स ऑफ इंडियाने 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रकाशीत केलेल्या बातमीनुसार बिहारच्या बेगुसराय येथील ऋतुराज चौधरी नावाच्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गुगलच्या एका प्रोडक्टमधील बग (त्रुटी) शोधून काढला. या त्रुटीमुळे हॅकर्सला गुगल प्रोडक्टमधील डेटा मिळवता येणे शक्य झाले असते. ही गंभीर बाब ऋतुराजने शोधून काढल्याबद्दल गुगलने त्याचे कौतुक करत संशोधकांच्या यादीत त्याचा समावेश केला. 

परंतु, या ठिकाणी त्याला गुगलने नोकरी दिल्याचा उल्लेख आढळत नाही.

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने ऋतुराज चौधरीशी संपर्क साधल्यावर त्याने व्हायरल दाव्याचे खंडण करताना सांगितले की, “गुगलकडून 3.66 कोटी रुपये पॅकेजच्या नोकरीची ऑफर आल्याची माहिती खोटी आहे. तसेच मी गुगलसुद्धा हॅक केले नव्हते. मी केवळ एक बग शोधून काढला होता. तसेच माझे शिक्षण आय.आय.आय.टी. मणिपूर कॉलेजमध्ये झाले आहे. माझ्याविषयी समाजमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत.”

ऋतुराजने नेमके काय केले?

तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर कंपन्यांतर्फे त्यांच्या सिस्टिममध्ये असणाऱ्या तांत्रिक व सुरक्षेसंदर्भातील त्रुटी शोधून काढण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलोपर्स, प्रोग्रामर्स आणि अभ्यासकांना आवाहन केले जाते. यालाच बग बाऊंटी प्रोग्राम म्हणतात. गुगलतर्फेसुद्धा असा एक प्रोग्राम चालविण्यात येतो. त्रुटी शोधुन काढण्याऱ्यांना कंपन्यांतर्फे रोखरक्कमदेखील जाते.

ऋतुराजनेसुद्धा 3 वर्षांपूर्वी अशाच बग बाऊंटीअंतर्गत गुगलच्या सिस्टिमधील एक त्रुटी शोधून काढली. सायबरसुरक्षेच्या भाषेत त्रुटींचे P5 ते P0 अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते. P0 ग्रेड म्हणजे सिस्टममला सर्वात मोठा धोका असलेली त्रुटी. ऋतुराजने शोधलेल्या bug ची श्रेणी P2 आहे.

ऋतुराज अद्यापही या प्रॉब्लेमवर काम करत असून, त्याच्या शोधकार्याची गुगलने दखल घेतलेली आहे.

मूळ पोस्ट – लिंक्डइन

लल्लनटॉपशी बोलताना ऋतुराजने सांगितले की, तो आय-आय-आय-टी मणिपूर कॉलेजमध्ये शिकतो. सोशल मीडियावर तो आयआयटीचा विद्यार्थी असल्याचे चुकीचे बोलले जात आहे. तसेच त्याचा भारत सरकारतर्फे दोन तासांत पासपोर्ट तयार करण्यात आला नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा 3 वर्षांपूर्वीचा असून दिशाभूल करणारा आहे. गुगलने ऋतुराज चौधरीला कोणत्याही नोकरीची ऑफर दिलेली नाही. 2022 मध्ये चौधरीला गुगलच्या सिस्टममध्ये एक बग आढळला आणि त्याने कंपनीला सतर्क केले. त्याबदल्यात गुगलकडून त्याला हॉल ऑफ फेम आणि संशोधकांच्या यादीत स्थान मिळाले. भ्रामक दाव्यासह हा मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.) 

Avatar

Title:बिहारच्या युवकाने गुगल हॅक केल्यावर त्याच कंपनीने त्याला 3.66 कोटीचे पॅकेज दिले का ? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar  

Result: False