
काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यावर स्वागतासाठी दिलेली विठुरायाची मूर्ती घेण्यासाठी नकार दिला या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी विठुरायाची मूर्तीचा स्वीकार केला होता.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधींचे स्वागत केले जात असून त्यांना एक व्यक्ती विठ्ठलांची मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहे.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “राहुल गांधी यांनी विठुरायाची मूर्ती घ्यायला दिला नकार. पण मावाआघाडीची मराठी अस्मिता पेनकिलर घेऊन बसली असल्याने दुखावली गेली नाही.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.
हा व्हिडिओ 14 मार्च 2024 रोजी भारत जोडो न्याय यात्रे निमित्त नाशिकमध्ये पारपडलेल्या शेतकरी सभेदरम्यानचा आहे.
राहुल गांधी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर 16 मिनिट 20 सेकंदावर आपण व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकता. या ठिकाणी राहुल गांधी यांना फेटा बांधुन आणि शाल देऊन त्यांचे स्वागत केले जाते. स्वागतादरम्यान एक इसम विठ्ठलांची मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु, राहुल गांधींना हार घालून फोटो काढणाऱ्या व्यक्तीने त्या इसमाच्या मूर्तीला बाजुला केले.
राहुल गांधी 17 मिनिट 28 सेकंदावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारताना दिसतात.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
या दिवशी राहुल गांधी यांनी बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक केला होता. खालील व्हिडिओमध्ये राहुल गांधी आणि नाना पटोले पूजा करताना दिसतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधी विठ्ठलाची मूर्ती स्विकारतात. खोट्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधी यांनी खरंच विठुरायाची मूर्ती घ्यायला दिला नकार का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
