
उद्धव ठाकरेंच्या भाषणाची क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, देशासाठी जो शहिद झाला, तो औरंगजेब जरी असला तरी तो आमचा भाऊ आहे, अस बोलो तर काय चुकल माझ ?
या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेबची स्तुती करताना त्याला शहीद म्हटले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात उद्धव ठाकरे औरंगजेब नावाच्या एका भारतीय सैनिकाबद्दल बोलत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन क्लिप उद्धव ठाकरे म्हणतात की, “औरंगजेब देशासाठी शहीद झाला. देशासाठी जो शहिद झाला, तो औरंगजेब जरी असला तरी तो आमचा भाऊ आहे, अस बोलो तर काय चुकल माझ ?”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “यामुळेच उद्धवने छावा चित्रपट बघितला नाही. कारण औरंग्याच्या प्रेमात तो पडलाय.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
दोन्ही व्हिडिओ क्लिप रिव्हर्स इमेज द्वारे सर्च करुन संपूर्ण भाषण ऐकल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.
क्लिप क्र. 1
पहिली क्लिप ही 2022 मधील असून तेव्हा उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) एका सभेत बोलत होते.
संपूर्ण भाषण नीट ऐकल्यावर कळाले की, उद्धव ठाकरे लष्करी जवान औरंगजेब याच्याबद्दल बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, “सध्या जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत. असाच एक भारतीय जवान सुट्टीसाठी आपल्या घरी चालला होता. दरम्यान वाटेतच त्याचं अपहरण करण्यात आलं. काही दिवसांनी त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेत आढळला. तो भारतीय जवान धर्माने मुस्लीम होता आणि त्याचं नाव औरंगजेब होतं. देशासाठी शहीद होणारा हा औरंगजेब आमचाच आहे. देशासाठी प्राण देणारा प्रत्येक मुसलमान आमचाच आहे.”
क्लिप क्र. 2
हा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी 23 जानेवारी 2024 रोजी शिवसैनिक मेळाव्यामध्ये केलेल्या भाषणाचा असून महाराष्ट्र टाईम्सने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते.
या ठिकाणी उद्धव ठाकरे 26:54 मिनिटावर एका शहिद सैनिकाबद्दल सांगताना म्हणतात
की, “काश्मिरमधील एक सैनिक (गन मॅन) औरंगजेब, ज्याने अतिरेक्यांविरोधात लढा दिला म्हणून त्यांला आपल्या देशाच्या सैन्याने शौऱ्यपदक दिल. अशा सैनिकाचे अतिरेक्यांनी आपहर केले आणि त्याला मारला. त्या वेळी मी म्हटल होतो की, देशासाठी शहिद झाला, तो
औरंगजेब जरी असला तरी तो आमचा भाऊ आहे, अस बोलो तर माझ
काय चुकलं ?”
अर्थात व्हायरल व्हिडिओमधील दोन्ही क्लिप एडिटेड आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात उद्धव ठाकरे मुघल सम्राट औरंगजेब नाहीतर औरंगजेब नावाच्या एका भारतीय सैनिकाबद्दल बोलत होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगाबजला नाही; ‘सैनिक’ औरंगजेबला शहीद म्हटले
Written By: Sagar RawateResult: Altered
