
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मी विरोधीपक्ष नेता असून माझे काम सरकारवर दबाव टाकने आहे. भारताच्या लोकशाहीला वाचवण्याचे माझे काम नाही.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात राहुल गांधी भारताय लोकशाही विरोधात बोलत नव्हते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक पत्रकार प्रश्न विचारतो की, “आपल्याकडे पुरावे असून जर निवडणूक आयोगाकडून उत्तर आले नाही, तर आपण कोर्टात जाणार का ?”
या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “माझे विरोधीपक्ष नेत्याचे काम आहे, सामान्य परिस्थितीत माझे काम विरोधी पक्षाची भूमिका घेणे आहे, सरकारवर दबाव आणण्याची भूमिका आहे. माझे काम भारताची लोकशाही वाचवणे नाही.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “भारताची लोकशाही वाचवणे माझे काम नाही: राहुल गांधी” असे लिहितात.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यातील एक भाग आहे.
राहुल गांधी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर 18 सप्टेंबर रोजी या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले होते.
संपूर्ण भाषण पाहिल्यानंतर लक्षात येते की, राहुल गांधी यांनी ‘आपण लोकशाही विरोधात आहोत’ असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
वरील व्हिडिओमध्ये 30:24 मिनिटावर राहुल गांधी काही कथित पुरावे दाखवत मत चोरीचा आरोप करताना म्हणतात की, “भाजपतर्फे सॉफ्टवेअरचा वापर करुन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या सोईनुसार मतदान यादीमध्ये नावे हटविण्यात किंवा जोडण्यात येते. हा सर्व प्रकार निवडणूक आयोग आणि त्यांचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांना माहित आहे. मी माझ्या सहकऱ्यांना सांगितले होते की, या प्रकरणी ब्लॅक अँड व्हाईट प्रूफ (लेखी पुरावा) असल्याशिवाय मी मंचावर जाणार नाही. मी संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करत असून तुमच्यासमोर सत्य आणत आहे.”
पुढे, 39:53 मिनिटावर एक पत्रकार राहुल गांधींना प्रश्न विचारतो की, “आपल्याकडे पुरावे असून जर इसीआय (निवडणूक आयोग) कडून उत्तर आले नाही तर तुम्ही न्यायालयात जाल का?”
या प्रश्नाचे प्रतिउत्तर देताना राहुल गांधी म्हणतात की, “माझे काम विरोधीपक्ष नेत्याचे आहे, सामान्य परिस्थितीत माझे काम विरोधी पक्षाची भूमिका घेणे आहे, सरकारवर दबाव आणण्याची भूमिका आहे. माझे काम भारताची लोकशाही वाचवणे नाही, मी ते करत आहे. मी ते स्टेजवर करत आहे. मला वाटते की, एक देशभक्त भारतीय म्हणून, भारतावर प्रेम करणारा, संविधानावर प्रेम करणारा म्हणून, भारतातील लोकांसमोर सत्य मांडणे हे माझे कर्तव्य आहे. आता जर भारतातील संस्थांना या बाबतीत काही करायचे असेल तर ते करतील, त्यापैकी बरेच आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, मला आश्चर्य वाटते की निवडणूक आयोगाचे लोक येत आहेत, माहिती देत आहेत आणि ते वाढत आहे.”
हेच वक्तव्य आपण काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात राहुल गांधी भारताय लोकशाही विरोधात बोलत नव्हते. मूळ व्हिडिओला एडिट करुन अर्धवट वक्तव्य पसरवले जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:“लोकशाही वाचवने हे माझे काम नाही”: राहुल गांधींचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
