
गर्दीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, बिहार विधानसभा निवडणूकनंतर तेथील जनतेने रस्त्यावर उतरून मतचोरीच्या विरोधात निदर्शने केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा नसून गुजरातमधील बिरसा मुंडा जयंतीचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर जमलेले लोक दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “वोट चोरी विरोधात सर्व बिहारी एकवटले.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा नाही.
चैतरवासव आर्मी नामक एका इंस्टाग्राम पेजने हाच व्हिडिओ 15 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये गुजरातीमध्ये लिहिले होते की, “चैतर वसावाचा एक वेगळाच माहोल आहे.” (भाषांतर)
तसेच कॅप्शनमध्ये ‘नेत्रंग’ असे हॅशटॅग वापरल्याचे आढळले.
अधिक सर्च केल्यावर कळाले की, चैतर वसावा हे गुजरातच्या देडियापाडा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार आहेत.
तसेच नेत्रंग हे गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील एक लहान शहर असून देडियापाडा मतदारसंघाला लागून आहे.
चैतर वसावा यांनी आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान बिरसा मुंडा यांची 150 व्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी नेत्रंगमध्ये एका भव्य रॅलीचे नेतृत्व केले होते. अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.
चैतर वसावा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या रॅलीचे दृश्य शेअर केले आहेत.
गुगल मॅपवर सर्च केल्यावर कळाले की हे दृष्य अंकलेश्वर-बुरहानपूर महामार्गावरील आहेत.
खालील तुलनात्म फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील तीन मजली इमारत आणि शेजारी असलेले कपड्यांचे दुकान एकच ठिकाणाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील 15 नोव्हेंबर रोजी देडियापाडा येथे रॅली काढत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली होती. अधिक महिती येथे व येथे वाचू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बिहारमधील मतचोरी निषेध मोर्चाचा नसून गुजरातमधील बिरसा मुंडा जयंतीचा आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:बिहारमधील मतचोर विरोधी मोर्चा म्हणून गुजरातमधील बिरसा मुंडा जयंतीचा व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading


