
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धावपट्टीवर एका विमानातून धूर निघताना आणि प्रवासी बाहेर पडताना दिसतात.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इस्रायलच्या विमानतळाचा असून इराणच्या हल्ल्यातून बचावलेल्या विमानाची ही दृष्य आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओचा इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये धावपट्टीवरील एका विमानातून धूर निघताना दिसतो. तसेच प्रवासी इमर्जन्सी गेटमधून बाहेर पडताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “असं म्हटलं जात होतं की जिवंत खुमेनी अमेरिकेसाठी इतके धोकादायक नाहीत, जितके ते मृत्यूनंतर ठरू शकतात… अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनीही इशारा दिला होता की खामनेई यांच्या मृत्यूनेच अमेरिका युद्ध जिंकू शकणार नाही. तरीही ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करून जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे… खामनेई यांच्या हत्येनंतर इराण अरब देशांपासून इस्रायलपर्यंत वेड्यासारखे हल्ले करत आहे. मला वाटतं नेतान्याहू यांचा अंत जवळ आला आहे… आणि आता युद्ध अधिक वेगाने वाढणार आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ इस्रायलमधील विमानतळाचा नाही.
‘ग्लोबल गव्हर्नन्स न्यूज’या वेबसाइटवर 28 जुलै 2025 रोजी प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओशी मिळती-जुळती क्लिप आढळली.
क्लिपसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अमेरिकन एअरलाईन्सच्या एका फ्लाइटशी संबंधित आहे. विमानाच्या लँडिंग गिअरला डेन्वरच्या विमानतळावर आग लागली होती.

टीआरटी वर्ल्ड वृत्तवाहिनीने 27 जुलै 2025 रोजी शेअर केलेल्या व्हिडिओ अहवालानुसार, अमेरिकन एअरलाईन्सची ‘बोईंग 737 मॅक्स 8 ही फ्लाइट’ मियामीकडे जात असताना विमानाच्या डाव्या मागील लँडिंग गिअरमध्ये आग लागली होती.
तसेच द इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, टायरला आग लागल्यामुळे विमानाला डेन्वर इंटरनॅशनल एअरपोर्टवर टेकऑफ थांबवावे लागले. विमानातील 173 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना इमर्जन्सी स्लाइड्सच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली होती.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ इस्रायल-इराणमधील सध्याच्या संघर्षाशी संबंधित नाही. मुळात हा व्हिडिओ जुलै 2025 रोजी अमेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये लागलेल्या आगीचा आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामवट्विटरयेथे फॉलो करा.)


