संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून “उठसूठ मी हिंदू का बोंबलता” असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

आपल्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविषयी एक दावा व्हायरल होत आहे. टीव्ही-9 मराठी वाहिनीचे ग्राफिक्स वापरून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून थेट उद्धव ठाकरेंनाच सवाल केला. 

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले की उठसूठ मी हिंदू, मी हिंदू, बोंबलत का फिरता?”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून हे वक्तव्य केले नव्हते. ते भाजपविषयी बोलत होते.

काय आहे दावा ?

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ‘टीव्ही – 9 मराठी’ चॅनलच्या बातमीचा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये संजय राऊत यांच्या फोटोसोबत लिहिले आहे की,“उठसूठ मी हिंदू, मी हिंदू असे का सांगत फिरता ?” 

त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या फोटोसह लिहिले आहे की, “संजय राऊत यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल!”

ही पोस्ट शेअर करताना युजर्सनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “संजयरावांचा माजी बेस्ट सीएम यांना सवाल.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये टीव्ही-9 मराठी वाहिनीचा लोगो आहे. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, हे स्क्रीनशॉट संजय राऊत यांनी 7 एप्रिल 2023 रोजी अहमदनगर येथे टीव्ही – 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीचे आहेत. 

या मुलाखतमध्ये संजय राऊत हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) भूमिका स्पष्ट केली होती. संपूर्ण मुलाखतमीमध्ये त्यांनी कुठेही उद्धव ठाकरेंना व्हायरल दाव्याप्रमाणे सवाले केला नव्हता. 

संजय राऊत यांनी ‘नकली हिंदुत्वा’चा आरोप करणाऱ्या भाजपवर तोंडसुख घेताना म्हटले होते की, भाजप आम्हाला विचारते की, तुमचे हिंदुत्व काय? आमच्यातलेच जे 40 जण फूटले ते म्हणतात की, आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. अरे मग तुम्ही काय करत आहात हिंदुत्वासाठी? सांगा ? हिंदुत्व हे काय दाखवत फिरण्याची गोष्ट नाही, ती आपली संस्कृती, संस्कार आणि जगण्याची भावना आहे. उठसूठ मी हिंदू, मी हिंदू, म्हणून नाचायचं आणि मशिदीवर दगडफेक करायची, अशा हिंदुत्वाला बाळासाहेब ठाकरे कधीच तयार नव्हते.

मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी “मी हिंदू, मी हिंदू बोंबलत फिरता” असे थेट म्हटले नव्हते. टीव्ही-9 मराठी वाहिनीने त्यांच्या वक्तव्याला थोडक्यात सांगण्यासाठी तसे लिहिले होते. तसेच संजय राऊत यांनी त्या अर्थाचे उद्घार भाजपला उद्देशून काढले होते, उद्धव ठाकरेंसाठी नाही.

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, खासदार संजय राऊत यांनी टीव्ही-9 मराठीला मुलाखत देताना उद्धव ठाकरेंना उठसूठ मी हिंदू, मी हिंदू असे का बोंबलत फिरता ?” असा सवाल केला नव्हता. तो सवाल त्यांनी भारतीय जानता पार्टीला केला होता. खोट्या दाव्यासह स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखीलकाहीसंशयास्पदमेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओकिंवाबातम्याअसतीलतरफॅक्टचेककरूनघेण्यासाठीत्याआमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्टफॅक्टचेकवाचण्यासाठीफॅक्टक्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटरयेथेफॉलोकरा.)

Avatar

Title:संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून “उठसूठ मी हिंदू का बोंबलता” असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading