
बाजारात बनावट दहा रुपयाचे नाणे आल्यानंतर सरकारने दहाचे नाणे चलनातून बाद केले, अशी अफवा काही वर्षांपासून राज्यात पसरलेली आहे. परिणामी अनेक दुकानदार व व्यापारी ग्राहकांकडून दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत.
विशेषतः ग्रामीण भागात दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास नकार मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.
परंतु, सरकारने दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी घातलेली नाही. पाहुया, या अफवेची सुरुवात कशी झाली.

मूळ पोस्ट – फेसबुक
अफवांना सुरुवात
2016 साली नोटबंदीद्वारे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यानंतर दिल्लीमध्ये 10 रुपयाटे बनावट नाणे तयार करणाऱ्या टोळीला पकडण्यात आले होते. एका पाठोपाठ अशा दोन घटना समोर आल्यानंतर अफवा पसरली की, सरकारने दहाचे नाणे बाद ठरविले.
आधीच सरकारने नोटबंदीसारखा मोठा निर्णय अचानक घेतला होता आणि त्यातच बनावट नाण्यांचे प्रकरणे उजेडात आले. यामुळे अफवांना खरं समजून अनेकांनी दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास बंद केले.
आरबीआयने केले खंडन
रिझर्व्ह बँकेने 2009 मध्ये 10 रुपयांची नाणी चलनात आणली होती. सध्या 14 प्रकारची नाणी चलनात असून त्यापैकी कोणतेही नाणे चलनातून बाद करण्यात आलेले नाही, असे आरबीआयने अनेकवेळा स्पष्ट
अफवा पसरू लागल्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2016 मध्येच स्पष्ट केले होते की, 10 रुपयाचे नाणे चलनातून बाद करण्यात आले नाही. चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता दहा रुपयाचे नाणे स्वीकारावे, असे आवाहनही करण्यात आले होते.

नाण्याच्या डिझाईनमुळे संभ्रम
आरबीयने 2011 मध्ये भारतीय रुपयासाठी नवे चिन्ह (₹) लागू केले होते. त्यामुळे बाजारात नवे चिन्ह (₹) असणारे नाणे आणि चिन्ह (₹) नसलेले जुने नाणे अशी दोन दहाची नाणी आहेत. ही दोन्ही नाणी वेगळी दिसत असली तरी ती दोन्हीपण वैध आहेत. तरीदेखील केवळ दहा रुपयांची जुनी नाणी स्वीकारण्याचा कल अधिक आहे. परंतु, पितळ व स्टेनलेस स्टील अशी दुहेरी आवरण असलेली नाणी स्वीकारण्यास व्यावसायिक स्पष्ट नकार देतात.
नाणे न घेणाऱ्यांना शिक्षा
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक नियमानुसार वैध नाणे स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. गेल्या वर्षी अकोल जिल्हा प्रशासनाने दिव्य मराठीला माहिती दिली होती की, नाणे नाकारणाऱ्या व्यक्तीकडून नाणे नाकारण्याचे कारण लेखी घ्यावे. त्याची मा्हिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करतील. या गुन्ह्यात दंडासह तीन वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांत म्हटले आहे.

Title:दहा रुपयाचे नाणे बंद झाले नाही; वर्षानुवर्षे एकच अफवा व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Explainer
