
सोशल मीडियावर उमा भारती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उमा भारती या कडक शब्दात टीका करत आहेत. त्या व्हिडिओच्या खाली इकडे भाजपने झाशी मधून उमा भारती यांचे तिकीट कापले व तिकडे उमा भारतीने भाजप व मोदींचे कपडे… असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत हा व्हिडिओ फेसबुकच्या वाजले की बारा या पेजवरुन 562 वेळा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 345 लाईक्स असून, 10 कमेंटस् आहेत.
फेसबुकवर हा व्हिडिओ इतर विविध ठिकाणीही व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भाजप नेत्या उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्या असे म्हणाल्या आहेत की, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1973 पासून ओळखतात. नरेंद्र मोदी यांना उमा भारती यांनी ‘विकास पुरुष’ च्या ऐवजी ‘विनाश पुरुष’ म्हणून संबोधले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेला जीडीपीचा दावा खोटा आहे असे म्हणत, उमा भारती यांनी बीपीएलचा दावा आणि बीपीएल लिस्ट खोटी आहे असे म्हटले आहे. गुजरातमध्ये विकास झाला नसून, विनाश झाला आहे असे त्या म्हणाल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी गुजरात कर्जाच्या डोंगरात बुडालेला असून, गुजरातमध्ये महिला सुरक्षित नाहीत, हिंदू-मुसलमान दोघेही गुजरातमध्ये भयभीत आहेत, असे त्या म्हणाल्या.
सत्य पडताळणी
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल सत्य शोधण्यासाठी गुगलवर उमा भारती लेटेस्ट न्युज असे टाईप केले. त्यानंतर उमा भारती स्टेटमेंट अगेस्ट नरेंद्र मोदी असे सर्च केले. दोन्हीही गोष्टी सर्च केल्यानंतर काही गोष्टी स्पष्टपणे समोर आल्या.
मुळात उमा भारती यांचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा 27 जुलै 2011 चा आहे. हा जुना व्हिडिओ आता निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युट्युबवर बीजेपी आज तक या चॅनलवर हा व्हिडिओ 27 जुलै 2011 रोजी अपलोड करण्यात आला आहे.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या खाली असे लिहिले आहे की, इकडे भाजपने झाशीमधून उमा भारती यांचे तिकीट कापले व तिकडे उमा भारती ने भाजप व मोदींचे कपडे…. यानुसार 2019 लोकसभा निवडणूकीसाठी उमा भारती यांचे तिकिट खरेच भाजपने कापले आहे का? याचा शोध घेतला. संशोधनाअंती असे आढळून आले की, 2019 लोकसभा निवडणूकीसाठी भाजप नेत्या उमा भारती यांनी स्वतःच निवडणूकीला उभे राहण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांचे तिकीट कापण्याचा विषयच येत नाही.
उमा भारती आणि 2019 लोकसभा निवडणूक तिकिट या संदर्भात विविध वर्तमानपत्र आणि चॅनलवर बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.
केंद्रीय नेत्या आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये त्या 2019 साठी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, तर 2024 साठी त्या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. याविषयावर युटुयबच्या दैनिक जागरण चॅनलवर 22 मार्च 2019 रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या 1.32 सेकंदापासून ते 2.16 सेकंदापर्यंत स्वतः उमा भारती यांनी 2019 लोकसभा निवडणूक तिकीट मुद्द्यावर स्पष्टपणे म्हटले आहे की, 2016 मध्येच त्यांनी हे जाहिर केले होते की, 2019 साठी त्या लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. जर कधी त्या लोकसभा निवडणूक लढल्या तर 2024 साठी त्या झाशीमधूनच लोकसभा निवडणूक लढवतील.
सर्व तथ्यांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, व्हायरल होणारा भाजप नेत्या उमा भारती यांचा व्हिडिओ हा जुना आहे. मुळ व्हिडिओ हा 2011 या वर्षातील आहे. दुसरी गोष्ट व्हायरल होणाऱ्या व्हिडिओखाली लिहिण्यात आलेल्या इकडे भाजपने झाशी मधून उमा भारती यांची तिकीट कापले व तिकडे उमा भारती ने भाजप व मोदींचे कपडे…. यातील भाजपने उमा भारती यांचे 2019 साठीचे लोकसभा निवडणूकीसाठीचे तिकिट कापले नसून, उमा भारती यांनी स्वतः 2019 लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे, असे स्पष्ट होत आहे.
निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणारा भाजप नेत्या उमा भारती यांचा व्हिडिओ सध्याचा नसून, 2011 वर्षातील आहे. व्हायरल व्हिडिओखाली लिहिलेली भाजपने झाशी मधून उमा भारती यांची तिकीट कापले हे तथ्य खोटे आहे. लोकसभा निवडणूकीच्या काळात सध्याचा संदर्भ अशी चुकीची माहिती देत जाणीवपुर्वक असे व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत.

Title:उमा भारतींचे भाजपने तिकिट कापल्यानंतर, त्या मोदीविरुद्ध बोलल्या? : सत्य पडताळणी
Fact Check By: Amruta KaleResult: False
