
नेपाळमध्ये पोखरा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात 68 प्रवशांसह 4 क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर या विमान दुर्घटनेचे कथित व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स आणि फोटो व्हायरल होऊ लागले.
अशाच एका क्लिपमध्ये विमान कोसळताना दिसते आणि सोबत दावा केला जात आहे की, हे दृश्य नेपाळ विमान अपघाताचे आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ जुना आढळला. रशियातील मॉस्को येथे लष्करी विमानाच्या झालेल्या दुर्घटनेचा हा व्हिडिओ आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये आगीने पेट घेतलेल्या विमान हवेतून जमिनीवर कोसळताना दिसते. विमान क्रॅश झाल्यावर मोठा स्फोट होतो. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “नेपाळ पोखरा दुर्दैवी विमान अपघात.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. इंडिया टुडे न्युजच्या युट्युब चॅनलवर हा व्हिडिओ उपलब्ध असून सोबतच्या माहितीनुसार 2021 मधील ही घटना रशियाची राजधानी मॉस्को येथील आहे. तेथे लष्करी विमानाचा असा अपघात झाला होता.
एपी न्युज वृतसंस्थेच्या वृत्तानुसार, 17 ऑगस्ट 2021 रोजी रशियाच्या सैन्यविमानांची चाचणी सुरू होती. अवजड सामानाची ने-आण करण्याचा सराव केला जात होता. यावेळी मॉस्कोच्या पश्चिमेला 45 किलोमीटर दूर एका विमानतळावर उतरत असतानाच एक विमान जंगलात कोसळले होते. यामध्ये दोन परीक्षक आणि एक फ्लाइट इंजीनियरचा मृत्यु झाला होता.
नेपाळमधील पोखरा अंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातापूर्वीचे खरे व्हिडिओ तुम्ही खालील बातमीमध्ये पाहू शकता.
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, विमान कोसळण्याचा हा व्हायरल व्हिडिओ नेपाळमधील मधील नाही. हा व्हिडिओ रशियामध्ये दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या विमानाचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:रशियातील जुना व्हिडिओ नेपाळ विमान अपघाताचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Missing Context
