रस्त्याच्या मधोमध पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये वेगवान वाहने आदळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

या व्हिडिओसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर शेअर करत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या रस्त्यांची दुर्दशा दाखवणारा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्राचा नसून चीनमधील आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यामध्ये मधोमध पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहने वेगवान आदळताना दिसतात. सोबत देवेंद्र फडणवीस यांचे “दर्जेदार रस्ते अथवा स्ट्रीट टॅक्स नाही हा माझा शब्द आहे !” असे लिहिलेले पोस्टर दाखवले आहे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “दर्जेदार रस्ते आणि फडणवीस यांचा शब्द.”

उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर हाच व्हिडिओ शेअर केला आहे.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राचा नाही.

चीनमधील ‘बिलीबिली’ नामक एका लोकप्रिय सोशल मीडिया वेबसाईटवर “Brother Xiaoqiang 123” नावाच्या युजरने हाच व्हिडियो 15 जुलै 2020 रोजी शेअर केला होता.

मूळ पोस्ट – बिलीबिली | आर्काइव्ह

सदरील अकाउंटची माहिती घेतल्यावर कळाले की, युजर केवळ खराब रस्त्यांचे व्हिडियो शेअर करतो. त्याने त्याच्या फॉलोवर्सना दयनीय रस्त्यांची माहिती देण्याची विनंती केली आहे. माहिती मिळताच तो स्वतः तेथे जाऊन रस्त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करतो.

खालील फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, युजरने व्हायरल व्हिडिओमधील ठिकाणाचे अनेक क्लिप्स जुन 2020 मध्ये शेअर केले आहेत.

तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यापलीकडील इमारतीवर आणि वाहनांवर चीनी भाषेतून मजकूर लिहिलेला आहे.

बिलीबिली वेबासाईटवरील व्हिडियोच्या कमेंटमध्ये सांगण्यात आले की, “हा व्हिडियो चीनमधील गुआंगझोऊ भागातील बैयुन जिल्ह्यातील शिजिंग अव्हेन्यू येथील आहे.”

गुआंगझोऊ ही दक्षिण चीनमधील गुआंगडाँग प्रांताची राजधानी आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. हा खड्डेमय रस्त्याचा व्हिडियो चीनमधील चीनच्या गुआंगझोऊ शहराचा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim Review :   दर्जेदार रस्ते आणि फडणवीस यांचा शब्द. जिथं बॅनर लागला आहे तिथेच रस्त्यांची ही अशी अवस्था आहे, मग इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  MISSING CONTEXT