सेन्सर्स असलेला भूमिगत कचराकुंडीचा हा व्हिडिओ कर्नाटकचा नाही; वाचा संपूर्ण सत्य

Partly False Social राजकीय | Political

सध्या सोशल मीडियावर सेन्सर्स असलेल्या भूमिगत कचराकुंडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, कर्नाटकमधील भाजप आमदार अभय पाटील यांच्याद्वारे बसवण्यात येणाऱ्या सेन्सर्ससंचालित भारतातील पहिला भूमिगत कचराकुंडी प्रणालीचा हा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा अंशतः भ्रामक आहे. कर्नाटकमध्ये 2022 मध्ये सेन्सर्स असलेल्या भूमिगत कचराकुंड्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकचा नसून तुर्कीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक वाहन अंडरग्राउंड हाइड्रोलिक डस्टबिन उचलना दिसते. या व्हिडिओमध्ये माहिती दिली की, “बेलगाव दक्षिनचे आमदार श्री अभाई पाटिल यांनी बेलगाव शहर स्वच्च आणि सुन्दर करण्याच्या हेतुने अंडरग्राउंड हाइड्रोलिक डस्टबिन आणि हाइड्रोलिक डस्टबिन उचलण्यासाठी 14 कम कॉम्पैक्टर विथ क्रेन अशा प्रकारे दोन कोटींचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे; जे येत्या 15 दिवसात बसवण्यात येणार आहे.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बेळगाव आ. अभय पाटील यांचा कचरा व्यवस्थापनचा अनोखा प्रकल्प.”

https://archive.org/details/fb-video-061125

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 12 वर्षांपूर्वीचा असून तुर्कीचा आहे.

हायड्रो-मॅक नामक एका युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 27 ऑगस्ट 2013 रोजी शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये कचरा उचलणाऱ्या वाहनावर “Üsküdar Belediyesi” असे नाव आणि 34 EF 4247 असा क्रमांक लिहिला होता. 

वाहनावर लिहिलेले नाव उस्कुदार नगरपालिका असून ही तुर्कीच्या इस्तानबूलच्या आशियाई किनाऱ्यावरील उस्कुदार जिल्ह्याची स्थानिक प्रशासकीय संस्था आहे. 

अर्थात व्हायरल होत असलेला व्हिडिओ बेळगाव कर्नाटकचा नसून तुर्कीचा आहे.

बेळगावमध्ये असा प्रोजेक्ट आहे का ?

बेळगाव दक्षिण मतदारसंघात 2022 मध्ये आमदार निधीतून 1 कोटी 56 लाख खर्च करून 18 हाय-टेक अंडरग्राउंड स्मार्ट बिन्स बसवण्यात आल्या होत्या.

या प्रत्येक बिनमध्ये सेन्सर बसवले असून याची किंमत सुमारे 6 लाख 50 हजार आहे. या बिन्समधील कचरा वेळेवर उपसा करण्यासाठी 80 लाख रुपयांची विशेष गाडीही उपलब्ध करून देण्यात आली.

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील बसवेश्वर सर्कलमध्ये येथे 9 डिसेंबर 2022 रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. 

आता या प्रकल्पाचा विस्तार बेळगाव उत्तर भागात करण्याची योजना स्थानिक प्रशासनाने आखली आहे. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

आमदार अभय पाटील यांनी आपल्या अधकृत ट्विटर अकाउंटवरुन या प्रकल्पाचे उद्घाटन करतानाचे फोटो शेअर केले होते.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा अंशतः भ्रामक आहे. भाजप आमदार अभय पाटील यांनी 2022 मध्येच कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील बसवेश्वर सर्कलमध्ये या स्मार्ट बिन्स बसवल्या होत्या. परंतु, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकचा नसून तुर्कीचा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या  व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला  फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सेन्सर्स असलेला भूमिगत कचराकुंडीचा हा व्हिडिओ कर्नाटकचा नाही; वाचा संपूर्ण सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result:Partly False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *