
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत दावा केला जात आहे की, “ही गर्दी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाची आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील गर्दी बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराजांच्या पालखीतील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रचंड गर्दी दिसते. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील दादा मुंबई मोर्चा साठी रवाना सरकारला धडकी भरवणारी तुफान गर्दी.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील गर्दी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाची नाही.
एका युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 1 ऑगस्ट रोजी अपलोड केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “खामगाव ते शेवगाव गजानन महाराजांसोबत भक्तांची तुफान गर्दी.”
‘साम टीव्ही’नेदेखील अधिकृत फेसबुक पेजवर हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. सोबत दिलेल्या महितीनुसार, आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेलेली संत गजानन महाराजांची पालखी 64 दिवसात 1400 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत शेगावला पोहोचली.
https://www.facebook.com/share/r/1FTdRHtip5
संत गजानन महाराजांची ही 56 वी वार्षिक पालखी असून ही पदयात्रा 1 जून रोजी पंढरपूरला रवाना झाली आणि 31 जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला परतली. या प्रवासात 700 पेक्षाजास्त वारकरी, भजन पथके आणि घोडे सहभागी झाले होते. अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – दिव्य मराठी
महत्वाची बाब म्हणजे मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईमधील आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतु, व्हायरल व्हिडिओ त्याआधीच म्हणजे 1 ऑगस्टपासून माध्यमांवर उपलब्ध आहे.
मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा
मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी येथून निघाले असून त्यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यााचा सरकारचा निर्णय रास्त ठरवल्यानंतर सरकारने त्यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे. याशिवाय आंदोलनस्थळी केवळ पाच वाहने आणि केवळ पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अधिक महिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
खालील व्हिडिओमध्ये आपण मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाचे थेट प्रक्षेपण पाहू शकतो.
निष्कर्ष
व्हायरल व्हिडिओ मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाचा नाही. मुळात ही गर्दी बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराजांच्या पालखीसाठी जमलेल्या भक्तांची होती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:ही मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाची गर्दी नाही; हा तर गजाजन महाराजांच्या पालखीचा व्हिडिओ
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
