स्वामी विद्यानंद विदेह यांनी पंडित नेहरूंना कानशिलात लगावली होती का? खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल

False राजकीय | Political

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या फोटोसोबत दावा केला जात आहे की, नेहरूंनी भाषणादरम्यान “हिंदू भारतात शरणार्थी आहेत.” असे म्हटल्यावर स्वामी विद्यानंद विदेह यांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो दाव्यासहीत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, अशी कोणतीही घटना घडली नव्हती. खोट्या दाव्यासह असंबंधित फोटो व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये पंडित नेहरू आणि त्यांच्या मागे लोकांचा गोंधळ दिसतो.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हा फोटो त्या वेळेचा आहे, जेव्हा स्वामी विद्यानंद विदेह यांनी नेहरू यांच्या कानशिलात जोरदार लगावली होती. कारण… नेहरू यांनी एका समारंभात त्यांच्या भाषणात म्हटले होते की, “हिंदू लोक भारतात निर्वासित (शरणार्थी) आहेत.” हे ऐकून, समारंभाचे मुख्य पाहुणे स्वामी विद्यानंद विदेहजी उभे राहिले आणि व्यासपीठावरच नेहरू यांच्या जोरदार कानशिलात मारली. व त्यांच्या जवळचा माईक काढून घेत म्हणाले, “आर्य हिंदू” लोक निर्वासित नसून, ते आमचे पूर्वज आहेत आणि या देशाचे मूळ रहिवासी आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वेबसाईटवर व्हायरल फोटो आढळला. 

फोटोसोबत केलेल्या वर्णनानुसार, “जानेवारी 1962 मध्ये भारतातील पाटणा येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीत गोंधळलेल्या गर्दीत उडी मारण्यापासून रोखण्यासाठी एका सुरक्षा रक्षकाने भारतीय पंतप्रधान नेहरूंना पकडले.”

मूळ पोस्ट – असोसिएटेड प्रेस

सदरील महितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर टाइम्स डेलीने 8 जानेवारी 1962 रोजी हाच फोटो वृत्तपत्रात छापला होता.

फोटो खालील मथळ्यात दिलेल्या महितीनुसार, “भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना शुक्रवारी पाटणा येथे गोंधळलेल्या गर्दीत घुसण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले, कारण त्यांनी वैयक्तिकरित्या सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय शेतकऱ्यांच्या हिंसक निषेधामुळे काँग्रेसच्या बैठकीत व्यत्यय आला. या हिंसाचारात जखमी झालेल्या 24 जणांना रुग्णालयात पाठवले.”

द इंडियन एक्सप्रेसने 6 जानेवारी 1962 रोजी छपलेल्या वृत्तातदेखील या घटनेचा आसाच उल्लेख केला होता.

या सभेत कुठे ही स्वामी विद्यानंद विदेह असण्याचा किंवा नेहरुजींना कानशिलात लगावल्याचा उल्लेख आढळत नाही.

स्वामी विद्यानंद विदेह

स्वामी विद्यानंद विदेह हे ‘वेदांचे प्रख्यात विद्वान’आणि योग जीवन शैलीचे उपदेशक होते. त्यांनी 14 फेब्रुवारी 1948 रोजी ‘वेद-संस्थान’ नावाच्या संस्थेची स्थापना केली होती. 

परंतु, स्वामी विद्यानंद विदेह यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कानशिलात लगावली, असा कोणताही उल्लेख व पुरावा आढळत नाही.

अधिक महिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. मूळात 1962 साली पाटणामध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीदरम्यान अचानक घुसलेल्या आंदोलकांपासून नेहरूजींना वाचवण्यासाठी अंगरक्षकांनी त्यांना पकडले असता हा फोटो काढण्यात आला होता.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:स्वामी विद्यानंद विदेह यांनी पंडित नेहरूंना कानशिलात लगावली होती का? खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: False