
सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘लय भारी’ फेसबुक पेजच्या लोगोसह लिहिले आहे की, “हिंदूच्या मतांची आता मला तितकीशी गरज भासणार नाही. मुस्लिम मतांवर विधानसभा पण जिंकून दाखवतो.”
दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडातळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड फेक असून उद्धव ठाकरेंनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही.
काय आहे दावा ?
उद्धव ठाकरेंचा फोटोसोबत लिहिले आहे की, “मला गर्व आहे मुस्लिम समाजामुळे माझे खासदार निवडून आलो. मी माझ्या भाषणात हिंदू उल्लेख बंद केला म्हणून भाजपला मिर्च्या झोंबल्या. हिंदूच्या मतांची आता मला तितकीशी गरज भासणार नाही. मुस्लिम मतांवर विधानसभा पण जिंकून दाखवतो. – उद्धव ठाकरे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्व प्रथम उद्धव ठाकरेंनी खरंच हे वक्तव्य केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर अशी माहिती मिळत नाही.
तसेच ‘लय भारी’ पेजच्या सोशल मीडिया अकाउंटवरसुद्धा हे ग्राफिक आढळत नाही.
या उलट ‘लय भारी’ पेजने 26 जून रोजी फेसबुकवर पोस्ट करीत हे ग्राफिक बनावट असल्याचे सांगितले होते.
त्यांनी लिहिले होते की, “आमच्या फेसबुक पेजचा लोगो वापरून चुकीचे विधाने प्रसार माध्यमांमध्ये पोहोचवण्याचे काम केले आहे. सदरील विधान आमच्या पेजचेने जाहिर केले. याबबत आम्ही ऑनलाइन तक्रार केली असून लवकरच कायदेशीक कारवाई करण्यात येईल.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनीसुद्धा प्रसार माध्यमांना सांगितले की, “उद्धव ठाकरे यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या नावाने खोटी बातमी पसरवली जात आहे.”
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले ग्राफिक बनावट असून ‘लय भारी’पेज कडून ते जारी करण्यात आलेले नाही. “मला हिंदू मतांची गरज नसून मुस्लिम मतांवर विधानसभा पण जिंकून दाखवतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले नाहीत.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:“मला हिंदूच्या मतांची गरज नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले नाही; खोटे विधान व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
