
भारतातील शाळेत विद्यार्थी स्ट्रॉबेरी क्विक नामक गुलाबी रंगाचा आणि टेडी बेअरच्या आकाराचा एक प्रकारचा क्रिस्टल मेथ ड्रग विकत घेत आहेत. या दाव्यासह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल दाव्यासह हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो ‘स्टॉक प्रतिमा’ असून 2007 पासून अफवा व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये एका प्लास्टिक बॅगमध्ये गुलाबी रंगाचे आणि टेडी बेअरच्या आकाराच्या गोळ्या आढळतात.
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “शाळांमध्ये नवीन ड्रग. तुमच्या शाळेत मुले नसली तरीही कृपया हे पास करा. या बद्दल पालकांना माहिती असायला हवी. ‘स्ट्रॉबेरी क्विक’ या नावाने ओळखले जाणारे हे नवीन ड्रग आहे. सध्या शाळांमध्ये एक अतिशय भीतीदायक गोष्ट सुरू आहे, ज्याबद्दल आपण सर्वांनी जागरूक असणे आवश्यक आहे. एक प्रकारचा क्रिस्टल मेथ आजूबाजूला चालू आहे. जे स्ट्रॉबेरी पॉप रॉक्ससारखे दिसते (तुमच्या तोंडात ‘पॉप’ होणारी कँडी). त्याचा वास स्ट्रॉबेरीसारखा आहे आणि तो शाळेच्या प्रांगणात मुलांना दिला जात आहे. ते याला स्ट्रॉबेरी मेथ किंवा स्ट्रॉबेरी क्विक म्हणत आहेत. ही कँडी आहे असा विचार करून मुले खात आहेत आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले जात आहे. हे चॉकलेट, पीनट बटर, कोला, चेरी, द्राक्ष आणि संत्रात देखील येते.”
तसेच टाइम्स ऑफ इंडियानेदेखील आपल्या बातमीमध्ये या व्हायरल मेसेजचा उल्लेख केला असून पालक आणि शाळा विद्यार्थांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचे लेखात म्हटले आहे.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर द सन वृत्तसंस्थेने 7 मार्च 2017 रोजी हाच फोटो शेअर केल्याचे आढळले.
या फोटोसोबत दिलेल्या बातमीनुसार इंग्लंडमधील मँचेस्टर या एक प्रमुख शहरात 13 वर्षीय चार मुलींने ‘टेडी बेअर एक्स्टसी गोळ्या’ खाल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वायथेनशॉ येथील सिविक सेंटरजवळ या तरुणींनी गुलाबी, ‘टेडी बेअर’ गोळ्या गिळल्या आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्याते त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खालील द सन बातमीच्या स्क्रीनशॉटमध्ये हाच फोटो स्टॉक प्रतिमा असल्याचे सांगितले आहे.
मूळ पोस्ट – द सन
स्ट्रॉबेरी क्विकची अफवा
अरुणाचल प्रदेश पोलिसांनी शाळकरी विद्यार्थांमध्ये स्ट्रॉबेरीच्या स्वादाची “मेथ कँडी” च्या प्रसाराबद्दलच्या अफवा फेटाळून लावल्या. तसेच पालकांनी या संदर्भात सोशल मीडिया पोस्टकडे लक्ष न देण्याची विनंती केली.
राजधानीचे पोलिस अधीक्षक रोहित राजबीर सिंग यांनीदेखील एका सूचनापत्रात स्पष्ट केले की, “स्ट्रॉबेरी मेथ” किंवा “स्ट्रॉबेरी क्विक” हे अंमली पदार्थ शालेय मुलांना कँडीच्या स्वरूपात वाटले जात असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट योग्य नाही. हा दावा खोटा असून पहिल्यांदा 2007 मध्ये अमेतिकेत समोर आला होता. तसेच यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशने सह कायदा अंमलबजावणी संस्थांनी वारंवार सांगितले आहे की, अशा प्रकारच्या फ्लेवर्ड मेथॅम्फेटामाइनचे अस्तित्व किंवा वितरण मुलांना लक्ष्य करत असल्याचे कोणतेही विश्वसनीय पुरावे नाहीत.” अधिक माहिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
जुनी अफवा
स्नोप्स तथ्य-तपासणी संस्थेने 29 एप्रिल 2007 रोजी अमेरिकेतील मुलांना “स्ट्रॉबेरी क्विक” नावाने रंगीत आणि चवदार मेथाम्फेटामाइन (एक प्रकारचं ड्रग) विकले जात असल्याचा अफवेचे खंडन केले होते.
स्नोप्सच्या लेखात फेडरल ड्रग एजन्सीने (DEA) सांगतात की, “काही रंगीत मेथाम्फेटामाइन आढळलं होतं जे कँडीसारखे दिसत होते. परंतु, ड्रग डिलर्स मुद्दामहून लहान मुलांना टार्गेट करण्यासाठी अशी चवदार आणि रंगीत ड्रग्ज बनवत आहेत, हा समज चुकीचा आहे.”
डीईएच्या प्रवक्ते स्पष्ट करतात की, “आमच्या तपासात अशी कोणतीही बाब समोर आली नसून असा काही ट्रेंड नाही. कदाचित कुणीतरी चांगल्या हेतूनं ही अफवा पसरवली असावी. परंतु, या कोणताही आधार नाही. आम्हाला कधीही ‘स्ट्रॉबेरी फ्लेवर’ असलेल्या मेथबद्दल माहिती मिळालेली नाही किंवा अशा प्रकारच्या ड्रग्समुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोणत्याही मुलांची नोंद नाही.” संपूर्ण माहिती येथे व येथे वाचू शकता.
थोडक्यात सांगायचे झाले तर ‘स्ट्रॉबेरी क्विक’ ही एक अफवा असून यामध्ये काहीही तथ्य नाही.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो हा ‘स्टॉक प्रतिमा’ आहे. 2007 मध्ये अमेरिकेतील मुलांना “स्ट्रॉबेरी क्विक” नामक ड्रग विकले जात असल्याची अफवा पसरली होती. खोट्या दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:भारतातील शाळेत विद्यार्थी ‘स्ट्रॉबेरी क्विक’ ड्रग विकत घेत असल्याची अफवा व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
