1 जानेवारीपासून चेकवर काळ्या शाईने लिहिण्यावर बंदी? वाचा सत्य

False Social

रिझर्व्ह बँकेने “1 जानेवारी पासून काळ्या शाईने लिहिलेले चेक बँकमध्ये स्वीकारले जाणार नाहीत” असा नवीन निर्णय जारी केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा असून आरबीआयने अशा नियमाची घोषणा केली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल दाव्यामध्ये ‘द टाईम्स ऑफ इंडिया’चा दाखला देत म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने नवीन नियम जारी केला की, 1 जानेवारीपासून काळ्या शाईने लिहिलेले चेक स्वीकारले जाणार नाहीत.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम रिझर्व्ह बँकेने अशी कोणताही नियम जारी केला असता तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी आढळली नाही.

आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर कथित नवीन नियमाचा कुठेही उल्लेख नाही.

 “चेक लिहिताना ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?” याविषयी आरबीआयच्या वेबसाईटवर

माहिती दिलेली आहे. 

आरबीआय सांगते की, चेक ट्रंकेशन सिस्टिम (CTS) अंतर्गत प्रत्येक चेकचे तीन इमेज स्कॅन घेतले जाते – समोरची ग्रे-स्केल इमेज, समोरची ब्लॅक अँड व्हाईट इमेज आणि मागची ब्लॅक अँड व्हाईट इमेज. त्यामुळे चेकवरील मजकूर स्पष्ट दिसण्यासाठी ग्राहकांनी इमेज-फ्रेंडली शाईचा वापर करावा. तसेच, फसवणूक होऊ नये यासाठी कायमस्वरूपी शाई वापरणे गरजेचे आहे. 

मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चेक लिहिताना विशिष्ट रंगाची शाई वापरण्याबाबत कोणतेही नियम घातलेले नाहीत.

ग्राहकांनी हे लक्षात ठेवावे की सीटीसी अंतर्गत बदल किंवा दुरुस्त्या केलेले चेक स्वीकारले जात नाहीत. चेकवर तारीख योग्य करण्यासाठी केलेल्या दुरुस्त्या वगळता, इतर कोणत्याही बदलांना परवानगी नाही. जर प्राप्तकर्त्याच्या नावात, आकड्यांमध्ये (रक्कम) किंवा शब्दांमध्ये लिहिलेल्या रकमेबाबत काही बदल करायचे असतील, तर नवीन चेक लिहावा. यामुळे बँकांना फसवणूक ओळखणे आणि टाळणे सोपे होते.

मूळ पोस्ट – आरबीआय

सदरील दावा व्हायरल झाल्यानंतर पीआयबीनेसुद्धा या दाव्याचे खंडण केले आहे. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा आहे. आरबीआयने “1 जानेवारी पासून काळ्या शाईने लिहिलेले चेक बँकेमध्ये स्वीकारले जाणार नाहीत” असा नवीन नियम जारी केला नाही. खोट्या दाव्यासह पोस्ट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:1 जानेवारीपासून चेकवर काळ्या शाईने लिहिण्यावर बंदी? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False