प्रकाश आंबेडकरांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले नाही; अर्धवट वक्तव्य व्हायरल 

False राजकीय | Political

महाराष्ट्रात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप-महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे, असा दावा व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल वक्तव्य अर्धवट असून प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना स्वत:चा पक्ष सोडून भाजप-महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल ग्राफिकमध्ये राजकीय घुराळा नावाचा लोगो आणि प्रकाश आंबेडकरचा फोटो दिसतो. ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “ज्यांना मतदान द्यायचं त्यांनी भाजप युतीला द्यावं, काँग्रेस आघाडीला देऊ नये, ज्यांना नसेल द्यायचं त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं आणि नुसतं मतदान न देता आमदार निवडून द्यावेत. – प्रकाश आंबेडकर”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल ग्राफिक संबंधित वंचित बहूजन आघाडीने 12 नोव्हेंबर रोजी ट्विटवर ही पोस्ट फेक असल्याचे सांगितले आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “फेक पोस्ट करून प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी संभ्रम निर्माण करणाऱ्याला तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील.” 

तसेच ‘राजकीय घुराळा’ या पेजचा शोध घेतल्यावर कळाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने व्हायरल ग्राफिक त्यांनी जाहिर केले. परंतु, ही पोस्ट शेअर केल्याबद्दल त्यांनी

12 नोव्हेंबर रोजी माफी मागितली.

मूळ पोस्ट – ट्विटर

कार्यकर्त्यांचा रोष

सकाळच्या बातमीनुसार अकोला प्रकाश आंबेडकरांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्ती विरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी. अन्यथा अकोला जिल्हा जाम करण्याचा इशारा वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी इशारा दिला आहे.

नेमक काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

अधिक सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल वक्तव्य अर्थवट असून प्रकाश आंबेडकरांनी 11 नोव्हेंबर रोजी लातूर येथे केलेल्या भाषणातून हे वक्तव्य घेतले आहे.

मुळात प्रकाश आंबेडकर म्हणतात की, “एससी व एसटी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेने मान्य केले आहे. या आदेशानुसार एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला तर सर्व कुटुंब लाभार्थी मानले जाईल आणि पुढे जाऊन त्याच्या कुटुबीयांना आरक्षणाला मुकावे लागेल.”

पुढे ते सांगतात की, “हा निर्णय तुम्हाला मान्य असेल तर भाजपा-काँग्रेसला मतदान करा. जर हा निर्णय मान्य नसेल तर वंचित बहूजन आघाडीला मतदान करा आणि आपला आमदार निवडून आणा!”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल वक्तव्य अर्धवट आहे. मुळात प्रकाश आंबेडकर भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत नव्हते. चुकीच्या संदर्भात आंबेडकरांचे अर्धवट वक्तव्य व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:प्रकाश आंबेडकरांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले नाही; अर्धवट वक्तव्य व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: False