
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर एका बँकेबाहेर रांगेत उभ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, “भारत युद्धादरम्यान बँका कोसळण्यापूर्वी घाबरलेले पाकिस्तानी लोक पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभे आहेत.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे. 2021 मध्ये काबूलमधील बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी अफगाण लोकांनी गर्दी केली होती.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये बँकेबाहेर लोकांची रांग दिसते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भारत युद्धादरम्यान बँका कोसळण्यापूर्वी घाबरलेले पाकिस्तानी लोक पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे.
एरियाना न्यूज संस्थेने हाच व्हिडिओ 30 ऑगस्ट 2021 रोजी शेअर केला होता. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “काबूलमध्ये बँका पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी, बँकांसमोर लोकांच्या लांब रांगा दिसून येत आहे.”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, 2021 मध्ये तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर बरेच दिवस अफगाणिस्तानातील कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार देण्यात आलेला नव्हता.
अफगाणिस्तानचे अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते अहमद वली हकमल यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ड्युएत्शे वेले वृत्त संस्थेला सांगितले की, आम्ही कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार देणार आहोत.
तसेच तालिबानचे प्रवक्ते इनामुल्ला समंगानी यांनी सांगितले की, लोकांच्या पेन्शनचे पैसेही लवकरच मिळतील.
हा निर्णय कर्मचाऱ्यांना कामावर परत आणण्यासाठी घेण्यात आला होता. अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.
मूळ पोस्ट – रॉयटर्स | आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वी असून भारत-पाकशी संबंधित नाही. 2021 मध्ये काबूलमधील बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी अफगाण लोकांनी गर्दी केली होती. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये लोक बँकेबाहेर रांगा लावत आहेत का? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
