
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये जनतेने भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असून चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक भाजपच्या प्रचार वाहनाला आडवतात आणि प्रचारकर्त्यांना मारहाण करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “गुजरात मधील द्वारके मधला हा प्रसंग आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी कोणती घटना माध्यमात आढळत नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, टाईम्स नाऊने या घटनेचा व्हिडिओ 6 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर अपलोड केला होता.
व्हिडिओसोबत दिलेल्या महितीनुसार ही घटना पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील असून ही मारहाण तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये झाली होती.
ईटीव्ही भारतच्या बातमीनुसार ही घटना हुगळीच्या चिनसुरामध्ये घडली होती.
या घटनेमध्ये टीएमसी नेते असित मजुमदार दिसतात. मजुमदारांनी दावा केला की, “आम्ही कोलकाताहून घरी जात असताना 30 – 25 भाजप समर्थकांनी त्यांची कार अडवली आणि त्यांच्यावर हल्ला केला.”
तर दुसरीकडे भाजपच्या सदस्यांनी सांगितले की, “आम्ही रॅली काढत असताना असित मजुमदार यांनी कोणताही इशारा न देता त्यांच्यावर हल्ला केला.”
या आधी देखील “लोकसभा प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.” म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत तो व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आढळला तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्रीय समिती (TRS) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली होती. संपूर्ण फॅक्ट-चेक येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असून लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये ही मारहाण झाली होती. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Title:लोकसभा प्रचारादरम्यान गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली का? जुना व्हिडिओ व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Misleading
