
पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वकीलांच्या जमावाद्वारे पोलिस सुरक्षेत असलेल्या एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, “अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला कोर्टात पोलिसांच्या समोर वकिलांनी जबरदस्त चोप दिला.”
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ छत्तीसगड येथील असून पंजाबमधील घटनेशी त्याचा काही संबंध नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये जमाव पोलिसांच्या सुरक्षेत असलेल्या व्यक्तीला मारहाण करताना दिसतो. व्हिडिओच्या डाव्याबाजुला अमृतसरमध्ये झालेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेदरम्यानच्या दृष्याचे स्क्रीनशॉट आहेत.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पंजाब अमृतसर या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या देशद्रोहीला कोर्टात पोलिसांच्या समोर वकिलांनी जबरदस्त चोप दिला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, आयबीसी-24 नामक युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 17 जानेवारी रोजी शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “रायपूर जिल्हा न्यायालयात वकिलांनी आरोपीला मारहाण केली.”
नवभारत टाईम्स आणि अमर उजालाच्या बातमीनुसार आरोपी अजय सिंह याने ज्येष्ठ वकील दुर्गेश शर्मा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. पीडित वकिलाच्या तक्रारीवरून खामत्राई पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी तरुणाला अटक केली. पोलिस आरोपीला न्यायालयात हजर करत असताना वकिलांनी त्याला मारहाण केली होती. या प्रकरणी वकिलांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
अमृतसरमधील प्रकरण
माध्यमांच्या महितीनुसार 26 जानेवारी रोजी पंजाबमधील अमृतसरच्या सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावरील टाऊन हॉल येथे असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आणि संविधानच्या प्रतिकृतीची एका माथेफिरुने विटंबना केली. यावेळी हेरिटेज स्टेटमध्ये तैनात असलेल्या खासगी एजन्सीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तेथील तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीचे नाव आकाश सिंग (वय 25) असून धरमकोट येथील रहिवासी आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबना करणाऱ्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून या घटनेसाठी कोणालाही माफ केले जाणार नाही, असे सांगितले. संबंधित अधिक माहिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अमृतसरचा नसून रायपूरचा आहे. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील रायपूर कोर्टमध्ये 17 जानेवारी रोजी एका वकीलावर हल्ला करणाऱ्या आरोपीला वकीलांच्या जमावाने मारहाण केल्याचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला वकिलांनी चोप दिल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
