
एका निदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पगडी घातलेले काही लोक भारतीय ध्वज आणि भारतीय संविधानाचे पोस्टर जाळताना दिसत आहेत. तसेच इंदिरा गांधींच्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न पुतळ्यासमोर दोन शिखांचे पुतळे बंदुका घेऊन उभे असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसून येते.
दावा केला जात आहे की, भारतीय ध्वज आणि संबिधानाचा आपमान करणारा हा व्हिडिओ पंजाबचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पंजाबचा नसून कॅनडाचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक भारतीय ध्वज आणि संविधानाचे पोस्टर जाळताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “संविधानाच्या प्रती जाळल्या जात आहेत; पण भीम आर्मी आणि भीमसेनेच्या लोकांचे रक्त उकळत नाही. संविधानाचे रक्षक नुकतेच म्हणाले आहेत. निवडणुकीच्या वेळी ते संविधान हातात घेऊन जात होते.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओमध्ये मीडिया बेझिरगनचा लोगो दिसतो.
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर मीडिया बेझिरगन युट्यूब चॅनलने या निदर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ 7 जून 2024 रोजी अपलोड केला होता.
व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीवरून कळते की, हा व्हिडिओ कॅनडामधील जे व्हँकुव्हर शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासात जमलेल्या खलिस्तानी समर्थकांच्या जमावाचा आहे.
मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह
निदर्शनाचे कारण काय ?
ऑपरेशन ब्लू स्टारच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त 6 जून रोजी संपूर्ण कॅनडातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सतेच व्हँकुव्हरमधील निदर्शनात इंदिरा गांधींच्या पुतळ्यासह एक झांकी काढण्यात आली. यामध्ये इंदिरा गांधींचे मारेकरी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग त्यांच्यावर बंदुका ताणताना दाखविण्यात आल्या होते.
त्या ठिकाणी आंदोलकांनी भारतविरोधी घोषणा देत खलिस्तानचे झेंडे फडकावले आणि तिरंगा आणि संविधानाची प्रत जाळण्यात आली. अधिक महिती येथे वाचू शकता.
कॅनडातील जस्टिन ट्रुडोच्या सरकारमधील मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी 8 जून 2024 रोजी त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट करत या घटनेचा निषेध करत सांगितले की, “व्हँकुव्हरमध्ये भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण करणाऱ्या प्रतिमांच्या बातम्या आल्या. कॅनडामध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देणे कधीही मान्य नाही.”
मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, तिरंगा आणि संविधानाचे पोस्टर जाळतानाचा व्हिडिओ पंजाबचा नसून कॅनडाचा आहे. व्हँकुव्हरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारला 40 वर्षे पूर्ण झाल्या पार्श्वभूमीवर हे निदर्शन करण्यात आले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:कॅनडात खलिस्तानी समर्थकांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा व्हिडिओ पंजाबचा म्हणून व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
