
काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दुचाकी वाहनांवर टोल नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही दुचाकी वाहने एका टोल प्लाझावर टोल भरताना दिसतात. या व्हिडिओवरून नितीन गडकरी यांच्याविधानाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेसवे असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही दुचाकी वाहने रांगेत एका टोल प्लाझावर टोल भरताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले होते की दुचाकी वाहनांना सर्व टोल नाक्यावर पूर्णपणे सूट मिळत राहील.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर ‘राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जात आहे’ अशी कोणतीही बातमी माध्यांवर आढळत नाही.
पुढे रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर पीआयबीने 21 ऑगस्ट रोजी याच व्हिडिओचे स्क्रिनशॉट शेअर केल्याचे आढळले. सोबत कॅप्शनमध्ये स्पष्ट लिहिले होते की, “हा उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेचा आहे, जो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. हा यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाद्वारे (व्हायईआयडीए)
नियंत्रित केलेला एक राज्यमार्ग आहे. जिथे टोल दर ‘व्हायईआयडीए’द्वारे निश्चित केले जातात.”
उत्तर प्रदेश सरकारच्या यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जेवार, मथुरा आणि आग्राला जाण्यासाठी वाहनांना लागणारे टोल दर दिलेले आहेत. यामध्ये दूचाकी वाहनांवर आकरण्यात येणारे टोलदरसुद्धा पाहू शकता.
मूळ पोस्ट – यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण
दुचाकींसाठी टोल आकारतो
टाइम्स नावच्या बातमीनुसार यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण नोएडा आणि आग्रा यांना जोडणाऱ्या 165 किलोमीटरच्या एक्सप्रेसवेच्या टोल दरात 1 ऑक्टोबर 2024 पासून 12% वाढ लागू करण्यात आली आहे. तसेच यमुना एक्सप्रेसवे हा भारतातील काही निवडक महामार्गांपैकी एक आहे जेथे दुचाकी वाहनांना टोल भरावा लागतो.
मूळ पोस्ट – टाइम्स नाव
जुन्या दाव्याची पार्श्वभूमी
यापूर्वीदेखील राष्ट्रीय महामार्गांवर 15 जुलैपासून दुचाकी वाहनांनाही महामार्गांवर टोल भरावा लागेल, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्याचे खंडण करत एनएजएआय आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दुचाकी वाहनांवर टोल नसल्याचे सांगितले होते. संपूर्ण फॅक्ट चेक येथे वाचू शकता.
दुचाकी महामार्गावर बंदी
सुरक्षेच्या दृष्टीने काही राष्ट्रीय महामार्गांवर सायकल, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना बंदी आहे. सविस्तर बातमी येथे, येथे व येथे वाचू शकता.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या ‘महामार्ग गाईडलान’नुसार एक्सप्रेसवे नेटवर्कवर, फक्त किमान चार चाकी असलेल्या मोटार वाहनांना परवानगी आहे. दोन/तीन चाकी, सायकल किंवा प्राण्यांनी ओढलेली वाहने प्रतिबंधित आहेत. अशा वाहनांना थांबवण्यात येईल आणि त्यांना इतर मार्गांनी जाण्याचा सल्ला/निर्देश देण्यात येईल.
मूळ पोस्ट – महामार्ग गाईडलान
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ राष्ट्रीय महामार्गांचा नाही. हा उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेसवे असून औद्योगिक विकास प्राधिकरणाद्वारे तयार केलेला आहे. हा एक्सप्रेसवे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तसेच राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वर बंदी आहे. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नितीन गडकरी यांनी नकार देऊनही दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जातोय का? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False
