
काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या ‘जॉय फोरम 2025’ या कार्यक्रमात अभिनेता सलमान खानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा स्वतंत्रपणे उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पाकिस्तानने बॉलिवूड स्टार सलमान खानला दहशतवादी घोषित केले. पाकिस्तानने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला त्यांच्या “चौथ्या अनुसूची” मध्ये समाविष्ट केले आहे, ही यादी दहशतवाद विरोधी कायदा (ATA) 1997 अंतर्गत आहे, जी बंदी घातलेल्या गटांशी किंवा अतिरेकी कारवायांशी संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवते. हे पदनाम खानच्या पाकिस्तानमधील प्रवास आणि आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालते. रियाधमधील एका व्यासपीठावर खानने केलेल्या अलीकडील टिप्पण्यांना प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे, जिथे त्याने “पाकिस्तान” वरून “बलुचिस्तान” वेगळे केले होते, ज्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कदाचित त्रास झाला असेल.अब्दुल रशीद सलीम सलमान खानचा जन्म, सलमान खान, हा एक प्रमुख भारतीय अभिनेता आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखला जातो.”
या पोस्टसोबत सलमान खानच्या भाषणाचा व्हिडिओ आणि एक पत्रक शेअर केले आहे. या पत्रकात पाकिस्तान दहशतवाद विरोधी कायद्या 1997 अंतर्गत सलमान खानचे नाव “चौथ्या अनुसूची”मध्ये समाविष्ट केल्याचे नमूद केले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल पत्रक लक्षपूर्वक पाहिल्यावर त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका आढळल्या. जसे की, “BALOCIIISTAN” हा शब्द मुळात “BALOCHISTAN” असा लिहिला जातो. “Terrarism” च्या जागी “Terrorism” असा लिहिला जातो. “Aftilisted” च्या जागी “Affiliated” असा शब्द लिहिला जातो.
तसेच या पत्रकात “Film” हा शब्द “Organisation” अर्थात संस्थेच्या कॉलममध्ये टाकलेला आढळला जे की, असामान्य आहे.

व्हायरल पत्रक बनावट
वरील पत्रकामध्ये 16 ऑक्टोबर ही तारीख नमुद करण्यात आली आहे. परंतु, सलमान खानने “जॉय फोरम 2025” या कार्यक्रम 17 ऑक्टोबर रोजी भाषण केले होते.
सौदी ऑन डिमांड नामक युट्यूब चॅनलने या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते.

मूळ पोस्ट – युट्यूब
पुढे, रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ‘बलोच वुमन फोरम’ यांनी 21 ऑक्टोबर रोजी ट्विट केलेले पत्रक आणि व्हायरल पत्रकामधील सिरीयल नंबर आणि लेटर नंबर एकच आहे.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, ‘बलोच वुमन फोरम’ यांनी शेअर केलेल्या पत्रकात फेरफार करत बनावट पत्रक खोट्या दाव्यासह पसरवले जात आहे.

पाकिस्तानचे खंडन
भारतीय माध्यमांवर ही बातमी पसरल्यावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 26 ऑक्टोबर रोजी ट्विट करत हा दावा खोटा आसल्याचे सांगितले.
(भारतात कायदेशीर मागणीनुसार पाकिस्तानचे ट्विट्स आपण भारतातून थेट पाहू शकत नाही.)
ट्विटमध्ये लिहिले होते की, “व्हायरल दावा खोटा आणि अयोग्य आहे. केवळ काही भारतीय माध्यमांनी हा दावा केला असून या मागे कोणतीही अधिकृत पाकिस्तानी याद्या किंवा जाहीरपत्रकांवर आधारित नाही. या बातमीत कोणतीही वस्तुस्थिती नसून केवळ सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न वाटतो. तसेच पाकिस्तान सरकारकडून अशा कोणतेही अधिकृत निवेदन, अधिसूचना किंवा नॅक्टा (NACTA) च्या वेबसाइटवरील बंदी घातलेल्या व्यक्तींच्या यादीत सलमान खान यांचे नाव आढळत नाही. अशा दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी संबंधित अधिकृत दस्तऐवजांद्वारे पडताळणी करा.”
अधिक महिती येथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा आहे. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले की, पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले नाही. दाव्यासोबत दाखवलेले पत्रक बनावट आहे. खोट्या दाव्यासह पत्रक व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले नाही; बनावट पत्रक व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Altered


