
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर चोरट्यांनी खिळे ठोकल्याचे दावे करणारे फोटो आणि व्हिडिओ मंगळवारी रात्री सोशल मीडियावर शेयर होऊ लागले. या महामार्गावरून जाणाऱ्या काही प्रवशांनीच हे खिळे दाखवत लूटमार करण्याचा हा कट असल्याची शंका व्यक्त केली.
सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कटकारस्थानाच्या दाव्याचे खंडण करीत स्पष्टीकरण दिले की, हे ‘खिळे’ महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लावण्यात आले होते.
प्रकरण काय आहे?
छत्रपती संभाजीनगर जवळील माळीवाडा येथे समृद्धी महामार्गावर ‘खिळे’ अंथरल्यामुळे काही वाहनांची टायर पंक्चर झाल्याचा प्रकार घडला होता. याबाबत प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्ती करीत चोरट्यांनी लूटमार करण्याच्या उद्देशाने हे काम केल्याचे म्हटले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीडियानेदेखील त्यांची दखल घेतली.
सत्य काय आहे?
सोशल मीडियावर समृद्धी महामार्गावर चोरट्यांनी खिळे ठोकल्याची कथित बातमी पसरल्यानंतर पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबत खुलासा केला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अधिकृत पत्रक काढून माहिती दिली की, छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावरील पहिल्या आणि दुसऱ्या लेनमध्ये 15 मीटर जागेवर सूक्ष्म तडे गेले होते. हे तडे ‘इपॉक्सी ग्राऊटिंग’ (Epoxy Grouting) तंत्राचा वापर करून भरून काढण्यासाठी रस्त्यावर अॅल्युमिनिअमचे नोजल्स ठोकण्यात आले होते. हे नोजल्स खिळ्यांप्रमाणेच दिसतात. खाली दिलेल्या फोटोमध्ये आपण ते पाहू शकता.

याच खिळे सदृश्य नोजल्सवरून काही वाहने गेल्यामुळे टायर पंक्चर झाले होते.
स्थानिक पोलिसांनीदेखील घटनास्थळी जाऊन याबाबत पाहणी केली. त्यानंतर दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 5 वाजता सर्व नोजल्स काढून टाकण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूनक सुरळीत चालू झाली.
महामार्गावर कोणताही घातपात किंवा चोरट्यांनी लूटमार केल्याची घटना घडलेली नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
इपॉक्सी ग्राऊटिंग म्हणजे काय?
काँक्रिटच्या रस्त्यावर किंवा महामार्गावर भेगा पडल्यावर त्यात पाणी शिरू नये आणि रस्त्याची बळकटी कायम ठेवून दुरुस्ती करण्यासाठी इपॉक्सी ग्राऊटिंग केली जाते. आधी तडे गेलेल्या भागातून धूळ-माती काढून नीट स्वच्छता केली जाते आणि मग त्या ठिकाणी इंजेक्शनप्रमाणे हे नोजल्स लावले जातात. नोजल्सच्या माध्यमातून इपॉक्सी राळ आणि हार्डनर मिसळून बनवलेले मिश्रण प्रेशरने तड्यांमध्ये भरले जाते, त्यामुळे ते मिश्रण आतल्या रिकाम्या जागांमध्ये घुसून पूर्णपणे भरते. यासंबंधी अधिक माहिती खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
निष्कर्ष
समृद्धी महामार्गावर चोरट्यांनी किंवा इतर समाजकंटकांनी खिळे ठोकलेले नाहीत. या सर्व अफवा आहेत. महामार्गावर खिळ्यांसारखे दिसणारे ते नोजल्स असून रस्त्यावरील तडे भरण्यासाठी ते लावण्यात आले होते.

Title:स्पष्टीकरण: समृद्धी महामार्गावर चोरट्यांनी खिळे ठोकले नाहीत; वाचा त्या ‘खिळ्यां’चे सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
