पाकिस्तानातील गणेश मंदिराच्या तोडफोडीचा जुना व्हिडिओ बांगलादेशच्या नावाने व्हायरल
बांगलादेशमध्ये हिंदूंवर कथित हल्ला होत असल्याचे अनेक व्हिडिओ माध्यमांवर उपलब्ध आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये जामावाद्वारे मंदिराची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, “बांगलादेशमध्ये हिंदूंनी गणपती बसवला तर तिथल्या मुस्लिम समुदायाने मंदिराची तोडफोड केली.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशचा नसून पाकिस्तानचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक मंदिराची तोडफोड करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेशमधी हिंदू लोकांनी गणपती बसवला तर तिथल्या मुस्लिम लोकांनी बघा काय हाल केले.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 पासून माध्यमांवर उपलब्ध आहे.
हरेश इदानी नामक युट्यूब चॅनलवर हाच व्हिडिओ 5 ऑगस्ट 2021 रोजी आपलोड करण्यात आला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पाकिस्तानात हिंदू मंदिर उद्ध्वस्त.”
डॉन न्यूजने 5 ऑगस्ट 2021 रोजी बातमी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार हा व्हडिओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात जमावाद्वारे एका हिंदू मंदिराची तोडफोड करतानाचा आहे.
घटनेमागील पार्श्वभूमी
तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये एका नऊ वर्षांच्या हिंदू मुलाने स्थानिक सेमिनरीमध्ये लघवी केल्याचा कथित आरोप करण्यात आला होता. स्थानिक मौलवीच्या तक्रारीवरून भोंग पोलिसांनी 24 जुलै 2021 रोजी पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 295 – ए (जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
काही दिवसानंतर कनिष्ठ न्यायालयाने त्या मुलाल जामीन मंजूर केल्यावर काही लोकांनी स्थानिकांना भडकावले. भडकलेल्या लोकांनी त्या भागात बंद पुकारला आणि गणेश मंदिराची तोडफोड केली.
इम्रान खानचा निषेध
या घटनेनंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करताना लिहिले की, “मी रहीम यार खान जिल्ह्यामधील भोंग शहरातील गणेश मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. तसेच मी पंजाबच्या (पाकिस्तान) पोलीस महानिरीक्षकांना सर्व दोषींना अटक करण्यासाठी आणि पोलिसांच्या निष्काळजीपणावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच सरकारद्वारे मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात येईल.”
जीर्णोद्धारीत मंदिर
खालील व्हिडिओमध्ये पाकिस्तान सरकारद्वारे जीर्णोद्धार केलेले गणेश मंदिर पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशचा नसून पाकिस्तानचा आहे. ही घटना 2021 मध्ये पाकिस्तानमधील भोंग शहरातील गणेश मंदिरात घडली होती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)