गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.

याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा वेबसाईटचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, "उद्धव ठाकरेंनी मराठी प्रमाणे उर्दू भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे."

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून एबीपी माझाद्वारे शेअर करण्यात आलेले नाही.

काय आहे दावा ?

उद्धव ठाकरेंचा फोटो आणि एबीपी माझा वेबसाईटचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसाच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, हि आमची मागणी आहे. - उद्धव ठाकरे"

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले असते तर नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी बातमी कुठेच आढळली नाही.

तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील हे ग्राफिक आढळले नाही.

याउलट एबीपी माझाच्या वेबसाईटवर असणारे ग्राफिक कार्ड आणि व्हायरल ग्राफिक कार्डमध्ये फरक आढळला.

एबीपी माझाचे खंडण

फॅक्ट क्रेसेंडोने एबीपी माझाचे सोशल मीडिया प्रमुख मेघराज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, “व्हायरल ग्राफिक बनावट असून एबीपी माझा द्वारे शेअर करण्यात आले नाही.तसेच ग्राफिकमध्ये वापलेला फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहे. परंतु, एबीपी माझा कॉन्टेंट कार्ड तयार करताना नेहमी लेटेस्ट फोटोंचा वापर करतो.”

वरील ग्राफिक आणि कथित ग्राफिक यांची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ ग्राफिकला एडिट करुन उद्धव ठाकरेंच्या नावाने पसरविले जात आहे.

अभिजात भाषा

कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचा अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले.

अभिजात भाषेच्या दर्जासाठी त्या भाषेचा नोंदवलेला इतिहास आणि साहित्य हा 1500-2000 वर्षं जुना असावा, असे व इतर निकष आहे.

भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे. ज्यामध्ये तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013), ओडिया (2014) आणि आता मराठी (2024) आहे. अधिक माहिती आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की,व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून एबीपी माझाद्वारे शेअर करण्यात आलेले नाही. तसेच उद्धव ठाकरेंनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. खोट्या दाव्यासह ग्राफिक व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim Review :   मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसाच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, हि आमची मागणी आहे. - उद्धव ठाकरे.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  ALTERED