अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईच्या मीरा रोड भागात आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर तेथील नया नगर परिसरात उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी बुधवारपर्यंत 10 गुन्हे दाखल केले असून 19 आरोपींना अटक केली. 

या पार्श्वभूमीवर घरातून काही लोकांना अटक करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुंबई पोलिसांनी मीरा रोड भागातील दंगलीतील आरोपींना अशा प्रकारे घरातून फरफटत ओढून अटक केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ हैदराबादमधील असून चुकीच्या माहितीसह तो मुंबईतील दंगलीसोबत जोडला जात आहे.

काय आहे दावा?

दीड मिनिटांच्या या क्लिपसोबत म्हटले आहे की, “घरात घुसून मारत काढले मीरा भायंदर मध्ये रात्रीं”

https://twitter.com/Ravi29778202/status/1750101755256566105

फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तर व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गाडीवर तेलंगणा राज्यातील नंबरप्लेट आहे. तसेच व्हिडिओच्या सुरुवातीलाच भिंतीवर “Shaffaf” नावाची पाटी दिसते.

ही हैदराबादच्या शालीबंदा भागातील मिनरल वॉटर कंपनी आहे.

हे धागे पकडून शोध घेतल्यावर एनडीटीव्ही वाहिनीने 25 ऑगस्ट 2022 रोजी हाच व्हिडिओ ट्विट केल्याचे आढळले. त्यानुसार, गेल्या वर्षी भाजपचे निलंबित वादग्रस्त नेते टी. राजा सिंग यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाविरोधात हैदराबादमध्ये जोरदार निदर्शन करण्यात आली होती. 

तेथील शालीबंदा भागात मोठ्या गर्दीसह प्रदर्शन करण्यात आले. यावेळी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. 

https://twitter.com/ndtv/status/1562623032757141510

याविषयी अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, हैदराबाद पोलिसांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी हिंसक प्रदर्शन करणाऱ्या मुस्लिम युवकांना त्यांच्या घरात घुसून अटक केली होती. पोलिसांच्या या कडक कारवाईचा व्हिडिओ त्यावेळीसुद्धा बराच गाजला होता. 

शालीबंदा भागातील एका सिनेमागृहाजवळ प्रदर्शनकारी जमावाने दगडफेक केली होती. गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेका ताब्यात घेतले होते.

अटक करण्यात आलेल्या युवकांच्या कुटुंबांनी पोलिसांवर मुस्कटदाबीचा आरोप लावला होता. 

https://www.youtube.com/watch?v=371k6UN10go

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, घरातून अटक करण्याचा हा व्हिडिओ मुंबईतील मीरारोड आणि भाईंदर शहरातील कारवाईचा नाही. हा व्हिडिओ 2022 मध्ये हैदराबादमध्ये हिंसक प्रदर्शन करणाऱ्यांना अटक करतानाचा आहे. मीरा रोड भागात परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दंगेखोरांना अटक करतानाचा हा व्हिडिओ मुंबईतील नाही; हैदराबादमधील जुना व्हिडिओ व्हायरल

Written By: Agastya Deokar

Result: False