बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तसेच पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्या भारतात आल्या आहेत. पंतप्रधान निवासस्थान रिक्त झाल्यानंतर निदर्शकांनी त्यांच्या घरात घुसून लुटालूट केली.

याच पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका पलंगावर तीन जण झोपलेले आहेत.

दावा केला जात आहे की, हा फोटो बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानातील आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानाचा नसून श्रीलंकेत 2022 साली झालेल्या आंदेलनादरम्यानचा आहे.

काय आहे दावा ?

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हा फोटो आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या बंगल्यातील.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो बांगलादेशचा नसून श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवासस्थानाचा आहे.

रॉयटर्सने हाच फोटो आपल्या अधिकृत वेबसाईटवर 10 जुलै 2022 रोजी अपलोड केला होता.

फोटोसोबत दिलेल्या बातमीनुसार श्रीलंकामध्ये राष्ट्रपतींना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडणाऱ्या उठावानंतर आंदोलकांनी प्रमुख सरकारी इमारती आणि निवासस्थानांवर ताबा मिळवला.

या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, श्रीलंका आर्थिक संकटात असताना राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पळून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निदर्शकांनी कोलंबोमधिल राष्ट्रपती निवासस्थानावर ताबा मिळवला आणि गोटाबाया राजपक्षे यांच्या पलंगावर निदर्शक झोपले.

पत्रकार दिनुका लियानवट्टे यांनी हे फोटो 10 जुलै 2022 रोजी काढले होते.

नॅशनल पब्लिक रेडिओच्या बातमीनुसार सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये श्रीलंकेमधील लोक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या संपत्तीचा आनंद लुटताना, फर्निचरवर आराम करताना, तलावांमध्ये पोहताना आणि होम जिममध्ये व्यायाम करताना दिसतात.

https://youtu.be/GzCmLMXXMRE

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानाचा नाही. ही घटना 2022 मध्ये श्रीलंकत घडली असून निदर्शकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानाचा ताबा घेतला होता.

Avatar

Title:व्हायरल फोटो बांगलादेश पंतप्रधान शेख हसीनांच्या बेडरूममध्ये झोपलेल्या निदर्शकांचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: False