सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ज्युलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियातील मुस्लिमांना आदेश दिला आहे की, “जर मुस्लिम नागरिकांना इस्लामिक शरिया कायदा हवा असेल तर त्यांनी या बुधवारपर्यंत हा देश सोडावा.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज फेक आहे. ज्युलिया गिलार्ड यांनी मुस्लिमांना देश सोडण्यास सांगितले नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिले की, “ज्या मुस्लिमांना इस्लामिक शरिया कायदा, अरब भाषा, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणे किंवा नमाज अदा करतांना ध्वनी प्रदूषण करणे इत्यादी गोष्ट हव्या असतील तर त्यांनी ऑस्ट्रेलिया सोडावा. तसेच ऑस्ट्रेलियाचा ध्वज, राष्ट्रगीत, धर्म किंवा जीवनशैली ज्या लोकांना मान्य नसेल तर त्यांनी आत्ताच हा देश सोडून द्यावा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी असे आवाहन केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, त्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या मेसेजच्या कोणत्याही भागाचे वर्णन कोणत्याही वृत्तात किंवा माध्यमात आढळत नाही. तसेच हा मेसेज 2019 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

व्हायरल मेसेजमधील कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा मेसेज विविध लेख आणि भाषणांच्या काही निवडक ओळींचा समावेश करून ज्युलिया गिलार्ड यांच्या नावाने तयार करण्यात आला आहे.

बॅरी लाउडरमिल्क वक्तव्य

व्हायरल मेसेजमधील “आम्ही इंग्रजी बोलतो अरब नाही.” आणि “आमचा ध्वज, राष्ट्रगीत, धर्म आणि जीवनशैली मान्य नसेल तर ऑस्ट्रेलिया सोडा” हे वक्तव्य जॉर्जियामधील स्थानिक वृत्तपत्राने 2001 मध्ये प्रकाशित केलेल्या लेखातून घेण्यात आले आहे.

खालील लेखामध्ये अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्यानंतर 2001 मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाचे दिग्गज आणि अमेरिकन राजकारणी बॅरी लाउडरमिल्क यांनी अमेरिकेत राहून पण अमेरिकन संस्कृती न पटणाऱ्या लोकांनी देश सोडण्यास सांगितले होते.

पोस्ट – व्हिएतनाऊ नॅशनल मॅगजीन

पीटर कॉस्टेलो वक्तव्य

“शरिया कायदा मान्य असलेल्या मुस्लिमांनी बुधवारपर्यंत ऑस्ट्रेलिया सोडून जावे” हे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन खजिनदार पीटर कॉस्टेलो यांनी केले होते.

पीटर कॉस्टेलो यांनी जुलै 2005 साली झालेल्या लंडन ट्यूब बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये वादविवाद करताना हे वक्तव्य केले होते. हा वादविवाद माजी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांच्या कारकिर्दीत झाला होता.

पोस्ट – माल्टा इंडिपेंडंट

जॉन हॉवर्ड यांचे वक्तव्य

“ऑस्ट्रेलियातील प्रत्येक मशिदीची चौकशी केली जाईल आणि या तपासात मुस्लिमांनी आम्हाला सहकार्य करावे” या वक्तव्याचे समर्थन ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांनी केले होते.

दि न्यूयॉर्क टाईम्सने 2005 मध्ये प्रकाशित केलेल्या बातमीनुसार ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान जॉन हॉवर्ड माध्यामांशी बोलतांना सांगितले की, “कोणत्याही धर्माच्या स्वातंत्र्यात व आचरणात हस्तक्षेप करण्याची सरकारची इच्छा नाही. तरी देखील कोणी हिंसाचार किंवा अतिरेक्यांना समर्थन देत आहे किंवा नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी मशिदी आणि इस्लामिक शाळांची चौकशी करण्यात येत आहे.”

निष्कर्ष

यावरून सिध्द होते की, व्हायरल मेसेज फेक असून ज्युलिया गिलार्ड यांनी मुस्लिमांना देश सोडण्यास सांगितले नाही. जुने, असंबंधित आणि दुसऱ्यांनी म्हटलेल्या वक्तव्यांना ज्युलिया गिलार्ड यांच्यना नावाने पसरविले जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी मुस्लिमांना देश सोडण्यास सांगितले नाही; खोटा दावा व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: False