चाळीसगावातील सोलर पॅनलच्या तोडफोडीचा व्हिडिओ वेगळ्याच कारणाने व्हायरल; वाचा सत्य
सोशल मीडियावर काही महिला आणि पुरुष सोलर पॅनलची तोडफोड करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत ना ना प्रकारचे दावे केले जात आहे. त्यापैकी एक दावा म्हणजे की, राजस्थानमध्ये एका पंडिताने या लोकांना सांगितले की सौरऊर्जेमुळे सुर्यदेवतेचा अपमान होतो. म्हणून या लोकांनी सोलर पॅनलवरच हल्ला केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, 2018 पासून हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील चाळीसगावातील ही घटना होती. कंपनीने पगार दिला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी असा रोष व्यक्त केला होता.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक हातोड्याने सोलर पॅनलची तोडफोड करताना दिसतात.
सोबत दावा केला जात आहे की, राजस्थानमध्ये एका पंडिताच्या सांगण्यावरून लोकांनी सोलर पॅनलची तोडफोड सुरू केली. सोलर पॅनलमुळे सूर्यदेवतेचा अपमान होतो, असे पंडिताने सांगितले होते.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हिडिओचे बारकाईने तपासणी केली असता त्यात मराठी भाषेप्रमाणे बोली ऐकू येते. अधिक तपास घेतल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ २०१८ पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
गो न्यूज वृत्तमाध्यमाने २१ फेब्रुवारी २०१८ रोजी हा व्हिडिओ ट्विट केला होता. सोबतच्या बातमीनुसार, चाळीसगावमधील सोलर कंपनीने पगार देण्यास टाळाटाळ केल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सोलर पॅनलीच तोडफोड केली होती.
चाळीसगाव तालुक्यात जेबीएम आणि आवादा ग्रुप या दोन सोलर कंपन्या आहेत. आधीपासून या कंपन्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत.
झी-२४ तासच्या ५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या बातमीनुसार, वन्यजीवांना धोका असल्याचे सांगत गावकऱ्यांनी सोलर प्रकल्पाला विरोध केला होता.
स्थानिक वृतवेबसाईट जळगाव लाईव्हच्या बातमीनुसार, शेतकऱ्यांच्या जमिनी अवाजवी दराने खरेदी करून सोलार कंपनीने शेतकऱ्यांवर अन्याय केल्याच्या आरोप करत व जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीकडून लढा सुरू आहे.
११ ऑक्टोबर २०२२ रोजी कंपनीबाहेर आंदोलन सुरू असताना काहींनी चिथावणी दिल्याने आंदोलन चिघळले आणि आंदोलकांनी कंपनीवर हल्ला केला होता. कंपनीतील सोलर पॅनल चोरून नेणे, घातक हत्यारांचा उपयोग करणे, कंपनीतील सोलर पॅनलची तोडफोड करणे अशी कृत्ये केल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तब्बल ४५ आंदोलकांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच सोलर कंपन्यांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ एका आंदोलकाने १९ फेब्रुवारी २०१८ रोजी विष प्राशन करण्याचाही ईशारा दिला होता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, चाळीसगावमधील जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. कंपनीने पगार दिला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी सोलर पॅनलची तोडफोड केली होती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)