अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत अवघ्या दोन दिवसात 3.17 करोड रुपये जमा झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दानपेटीतून काढळलेल्या पैश्यांचा ढीग दिसतो.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. ही दानपेटी राजस्थानमधील ‘सांवरिया जी मंदिरा’ची आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक दानपेटीमधील नोटा टोपल्यात टाकताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीत पहिल्या दोन दिवसातच 3.17 करोड़ जमा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ राम मंदिराचा नाही.

इंस्टाग्रामवर sanwaliya_seth_1007 नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ 16 जानेवारी रोजी पोस्ट केलेल्याचे आढळले. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “श्री सांवलिया सेठ :- यावेळी विक्रमी 12 कोटी 69 लाख रोख देणगी देण्यात आली.”

https://www.instagram.com/reel/C2J43GRgDnv/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

हे इंस्टाग्राम अकाउंट नितीन वैष्णव नामक व्यक्तीचे आहे. आपण या श्री सांवलिया जी मंदिराचे मुख्य पुजारी असल्याचे वैष्णव यांनी इंस्टाग्रामवर नमुद केले आहे. 

तसेच खालील फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमध्ये अण्य लोकांसोबत पुजारी नितीन वैष्णव देखील दानपेटीमधून पैसे टोपल्यात टाकताना दिसतात.

अधिक महितीसाठी कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील उदयपूर शहरापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर हे ‘श्री सांवलिया सेठ मंदिर’ स्थित असून येथे भगवान कृष्णाची मूर्ती आहे.

तसेच 4 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिराला भेट दिल्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला होता. या व्हिडिओ 10 सेकंदावर आपल्याला मंदिराच्या आतील भागातील रेलींग दिसते.

खालील तुलनात्मक फोटोमध्ये व्हायरल व्हिडिओ आणि पंतप्रधानांनी शेअर केलेल्या मंदिराच्या रेलींगची तुलना करण्यात आली आहे. यावरुन आपल्या लक्षात येईल की, दोन्ही स्क्रिनशॉर्ट एकाच मंदिराचे आहेत.

मंदिराला कोट्यावधीचे दान

एबीपी न्यूजच्या बातमनुसार या जानेवारी महिन्यात श्री सांवलिया सेठ मंदिराची दानपेटी उघडून मोजणी केल्यावर 6 कोटी 21 लाख 70 हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम काढण्यात आली आहे. याशिवाय सोने, चांदी आणि मनी ऑर्डरची मोजणी बाकी आहे.

राम मंदिर दान

द टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार राम मंदिराला प्राणप्रतिष्ठा दिनी ऑनलाइन देणगीद्वारे तब्बल 3.17 कोटी दान मिळाले आहेत. परंतु, मंदिराती 10 दानपेट्यांमधील रोख रक्कम अद्याप मोजण्यात आलेली नाही. 5 लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिल्या असून महाराष्ट्रातील भाविकांनी सोने आणि पितळ्याची 80 किलो वजनाची तलवार ट्रस्टला दान करण्यात आली.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. ही दानपेटी राजस्थानमधील श्री सांवलिया सेठ कृष्ण मंदिराची आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अयोध्यातील राम मंदिर म्हणून राजस्थानच्या संवलिया सेठ मंदिराच्या दानपेटीचा व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading