रेल्वे रुळाचे नट-बोल्ट काढतानाचा व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे; भारतातील नाही
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लहान मुलं रेल्वे रुळावरून नट-बोल्ट काढताना दिसतात.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ भारतातील आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक कार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून पाकिस्तानमधील कराची शहरातील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुलं रेल्वे रुळाचे नट-बोल्ट काढताना दिसतात.
युजर्स या व्हिडिओला सांप्रदायिक रंग चढवून शेअर करीत आहेत.
मूळ पोस्ट - फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा आहे.
द कराची एक्सपोजर नामक फेसबुक पेजने 3 डिसेंबर 2023 रोजी हाच व्हिडिओ अपलोड केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "सर ताजखान गेट, बोट बेसिन चौकाजवळ मुले रेल्वे ट्रॅकच्या फिश प्लेट्स उघडून ती रद्दीवाल्यांना विकतात, ही एक बेकायदेशीर प्रथा आहे. पाकिस्तान सरकारने यावर तात्काळ कारवाई करावी."
मूळ पोस्ट - फेसबुक | आर्काइव्ह
पाकिस्तान कराचीच्या साउथ झोन पोलिस मीडिया सेलने 5 डिसेंबर 2023 रोजी फेसबुकवर हाच व्हिडिओ शेअर करत माहिती दिली की, सर ताजखान गेटजवळील रेल्वे ट्रॅकवरून नट- बोल्ट चोरीचे प्रकरण उघडकीस येताच बेसन पोलीस स्थानकाच्या प्रभारींनी कारवाई करून मुलांना पकडले. नंतर प्रभारींनी चेतावणी देत पालकांच्या ताब्यात दिले.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ भारताशी संबंधित नाही. पाकिस्तान पोलिसांनी स्पष्ट केले की, हा व्हिडिओ कराचीचा आहे. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)