आफ्रिकेतील बोट उलटल्याचा व्हिडीओ गोव्याचा म्हणून व्हायरल

Update: 2024-10-09 13:54 GMT

समुद्रात प्रवासी बोट उलटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन दावा केला जात आहे की, ही घटना गोव्यामध्ये घडली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. बोट उलटल्याचा हा व्हिडिओ काँगोच्या किवू सरोवरातील आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्रात असंख्य लोकांनी भरलेली बोट उलटताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, "गोवा.. आजची अत्यंत दुर्दैवी घटना, लोभामुळे मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी बोटीत भरल्याने अपघात २३ मृतदेह मिळाले ४० वाचवले ६४ बेपत्ता."

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ गोव्याचा नाही.

असोसिएटेड प्रेस अर्थात एपी न्यूज चॅनलने 4 ऑक्टोबर रोजी आपल्या युट्यूब चॅनलवर याच घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिसे होते की, "पूर्व काँगोमध्ये बोट बुडून किमान 78 जणांचा मृत्यू झाल्याचा क्षण हा व्हिडिओ दाखवतो."Full View

असोसिएटेड प्रेस, रॉयटर्स, द गार्डियन आणि अल जझीराने प्रकाशीत केलेल्या बातमीनुसार डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमधील किवू सरोवराच्या किनाऱ्यापासून काहीशे मीटर अंतरावर 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 278 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने किमान 78 लोक बुडाले आणि बरेच जण जखमी व बेपत्ता झालेले आहेत.

मूळ पोस्ट – द गार्डियन

गोवा पोलिस खंडण

गोवा पोलिसने 5 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर पोस्ट करत स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओचे स्क्रीनशॉट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गोव्याच्या किनाऱ्याजवळ एका बोट उलटल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, हे खोटे आहे. ही घटना आफ्रिकेतील काँगो येथे घडलेली आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, बोट उलटल्याचा व्हायरल व्हिडिओ गोवाचा नसून मध्य आफ्रिकेच्या काँगोत देशातील किवू सरोवराचा आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim :  गोवामध्ये बोट उलटल्याने या दुर्घटनेत 40 प्रवासी वाचले, तर 23 मृत्यू आणि 64 प्रवासी बेपत्ता झाले.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  MISSING CONTEXT
Tags:    

Similar News