EXPLAINER – साबरमती नदीमध्ये खरंच कोविड-19 विषाणू सापडला का?

Update: 2021-06-24 04:38 GMT

गुजरातमधील साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू आढळला, अशा आशयाच्या बातम्यांनी गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडवून दिली. अहमदाबाद शहरामध्ये तर अफवा पसरली की, पिण्याच्या पाण्यातूनही कोरोना विषाणू पसरत आहे.

आयआयटी गांधीनगर या संस्थेच्या संशोधनाचा हवाला देत या बातम्या देण्यात आल्या आणि त्यावरून सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले. मराठीमध्येदेखील अनेक माध्यामांनी ही बातमी प्रकाशित केली. (लोकसत्ता, लोकमत, सकाळ)

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

सदरील संशोधन नेमके काय म्हणते, त्यात कोणत्या बाबी समोर आल्या, साबरमती नदीमध्ये खरंच कोविड-19 विषाणू आढळला का आदी जाणून घेण्यासाठी आम्ही संशोधनप्रमुख आणि आयआयटी गांधीनगरचे पृथ्वी व विज्ञान विभागाचे प्रा. मनीष कुमार यांच्याशी संपर्क साधला.

काय आहे संशोधन?

आयआयटी गांधीनगरमधील संशोधकांनी गेल्या वर्षी नैसर्गिक पाणीसाठ्यामध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय भाग आढळतात का, हे जाणून घेण्यासाठी संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत अहमदाबाद आणि गुवाहटी या दोन शहरातील विविध तलाव आणि नदीसाठ्यातून पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते.

प्रा. मनीष कुमार म्हणाले की, “सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी असणाऱ्या शहरांमध्ये सांडपाण्याची नियमित तपासणी करण्याची आवश्यकता आणि क्षमता जोखण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.”

युनिसेफ (गुजरात) आणि युके-इंडिया एज्युकेशन रिसर्च इनिशिएटिव्ह (UKIERI) यांनी प्रकल्पाला निधी दिला होता.

संशोधनामागील कारणे

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मलोत्सर्जानातून कोविड-19 विषाणू बाहेर पडू शकतात. अशा संसर्गजन्य व प्रक्रिया न झालेल्या सांडपाण्यातून आसपासच्या वातावरणात कोविड-19चा फैलाव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः भारतातसारख्या देशात जेथे उघड्यावर शौच करणे व नाले-गटारातील पाणी नैसर्गिक पाणीसाठ्यात सोडण्याचे प्रमाण जास्त आहे.

“भारत आता तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सांडपाणी आणि नैसर्गिक पाणीसाठ्यांमध्ये कोरोनाचे जनुकीय भाग आढळतात का याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. त्यातूनच आपल्याला आगामी काळातील फैलाव व त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा अंदाज घेता येईल,” प्रा. कुमार म्हणाले.

संशोधनात काय सापडले?

अहमदाबाद येथील साबरमती नदी, कांकरिया तलाव, चांदोला तलाव आणि वस्रापूर तलाव येथून 3 सप्टेंबर ते 29 डिसेंबर 2020 दरम्यान पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते.

प्रयोगशाळेत त्यावर RT-PCR चाचणी केली असता कळाले की, नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचे N, S, and ORF 1ab अशी जनुकीय भाग आढळले.

साबरमती नदी चांदोला व कांकरिया तलावातील नमुन्यांमध्ये N जीन; चांदोला तलावामध्ये आणि ORF 1ab जीन; शिवाय तिन्ही तलावांमध्ये S जीनच्या कॉपीज् आढळल्या.

गुवाहटी येथून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोविड-19 विषाणूचे जनुकीय भाग आढळले नाही.

माध्यमांनी बातमी देताना काय दुर्लक्षित केले?

वरील संशोधनावर आधारित रिसर्च पेपर medRxiv नावाच्या वेबसाईटवर 16 जून रोजी प्रकाशित झाला.

“The Spectre of SARS-CoV-2 in Ambient Urban Natural Water in Ahmedabad and Guwahati: A Tale of Two Cities”असे या पेपरचे नाव आहे.

तो प्रकाशित झाल्यानंतर माध्यमांनी त्यावर बातम्या प्रकाशित केल्या की, साबरमती नदीच्या पाण्यात कोरोना आढळला. येथेच बातमी देण्याची घाई झाली.

कारण medRxiv वेबसाईटवर स्पष्ट म्हटलेले आहे की, सदरील संशोधन पेपर ही प्रीप्रिंट असून, अद्याप त्याचा पीअर-रिव्ह्युव झालेला नाही. म्हणजेच या संशोधनाचा इतर तज्ज्ञांनी तपासणी केलेली नाही आणि अद्याप मान्यताही दिलेली नाही.

थोडक्यात काय तर माध्यमांनी यावरून बातमी प्रकाशित करत असताना वाचकांना याची कल्पना देणे आवश्यक होते की, संशोधन पीअर रिव्ह्युव झालेले नाही आणि त्याचा हा अंतिम मसुदा नाही.

अहमदाबाद महानगरपालिकेचा खुलासा

साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू सापडल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद महानगरपालिकेने नदीतील पाण्याचे नमुने गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राकडे (GBRC) पाठवले.

पाणी विभागातील अभियंते हरपालसिंग झाला यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, “आयआयटी गांधीनगरतर्फे करण्यात आलेल्या संशोधनाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे. पाण्यामध्ये जिवंत कोविड-19 विषाणू आढळले नसून, शहरातील पिण्याचे पाणी अत्यंत सुरक्षित आहे. नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही.”

अहमदाबाद महानगरपालिकेतील आरोग्या विभागाचे प्रमुख डॉ. भाविन सोलंकी यांनी सांगितले की, “अहमदाबाद शहराला नर्मदा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, साबरमती नदीतून नाही. साबरमती नदी केवळ सौंदर्यकरणासाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करून नये.”

मग अंतिम निष्कर्ष काय?

प्रकाशित झालेल्या मूळ पेपरमध्ये कुठेही म्हटलेले नाही की, पाण्यामध्ये जिवंत कोरोना विषाणू आढळला. त्यात केवळ एवढेच नमुद केलेले आहे की, पाण्याच्या नमुन्यांमध्ये कोविड-19 विषाणूचे जनुकीय भाग आढळले. यातून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, असे म्हटलेले नाही.

“आमच्या संशोधनामध्ये अहमदाबादमधील पाण्याच्या नमुन्यांमध्ये जिवंत किंवा संसर्ग फैलावणारा कोरोना विषाणू आढळला नाही. आम्हाला केवळ जनुकाचे काही भाग आढळले. आमच्या संशोधनाचा मीडियाने चुकीचा अर्थ काढला,” असे प्रा. कुमार यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जनुकीय भाग आढळल्याचा अर्थ एवढाच आहे की, स्वच्छतेचा अभाव असून त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

याचाच अर्थ की, साबरमती नदी कोविड-19 विषाणूने संसर्गित झाली, अशा आशयाचा अफवा पसरवू नये.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:EXPLAINER – साबरमती नदीमध्ये खरंच कोविड-19 विषाणू सापडला का?

Fact Check By: Agastya Deokar

Result: Explainer

Tags:    

Similar News