माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशमधील हिंसाचाराने जोर धरला आहे.

याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिलेचे हात-पाय बांधलेले आहेत आणि तिच्या तोंडावर पट्टी बांधलेली आहे.

दावा केला जात आहे की, बांगलादेशमध्ये हिंदू महिलांची दुर्दशा दाखवणारा हा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मुलगी अवंतिका नामक विद्यार्थींनीच्या आत्महत्येच्या निषेधार्थ जगन्नाथ विद्यापीठात पथनाट्य करत होती.

काय आहे दावा ?

हात-पाय आणि तोंड बांधलेल्या महिलेचा हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेशात हिंदूंवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जे हल्ले होत आहेत, ते केवळ अल्पसंख्याक झाले आहेत, त्याला तेथील हिंदूं हा सर्वधर्म समभाव हा अवगुण कारणीभूत आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ बांगलादेशची राजधानी ढाकामधील जगन्नाथ विद्यापीठामधील विद्यार्थांनी केलेल्या पथनाट्याचा आहे.

खालील फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील मुलीचा बांधण्यात आलेली जागा आणि जगन्नाथ विद्यापीठमधील कॅम्पस हे एकच ठिकाण आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

जगन्नाथ विद्यापीठाची विद्यार्थिनी फैरुझ सदफ अवंतिका हिच्या आत्महत्येच्या निषेधार्थ जगन्नाथ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निषेध रॅली, मशाल मिरवणूक यासह विविध कार्यक्रम घेतले होते.

विद्यार्थ्यांनी अरोप केला की, “विद्यापीठ प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अवंतिकाला आत्महत्येकडे ढकलले. या घटनेची चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे.”

खालील फोटोमध्ये आपण अवंतिकाच्या आत्महत्येच्या घटनेवर विद्यापीठाच्या नाट्यविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर कलेमध्ये व्हायरल व्हिडिओमधील मुलगी पाहू शकतो.

मूळ पोस्ट – प्रथम आलो | सांगबाद प्रतिदिन

चॅनल 24 नामक युट्यूब चॅनलने 18 मार्च रोजी जगन्नाथ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येच्या निषेधार्थ घेतलेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “अवंतिकाच्या मृत्यूला न्याय मिळावा या मागणीसाठी मशाल मोर्चा.”

व्हिडिओच्या 0:45 आणि 1:20 मिनिटावर आपण व्हायरल व्हिडिओमधील मुलगी पाहू शकता.

अधीदेखील खोटा दावा व्हायरल

या पूर्वी व्हायरल व्हिडिओसोबत दावा व्हायरल झाला होता की, बांगलादेशमधील छात्र लीगच्या नेत्याचा छळ गेला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर द न्यूज 24 चॅनलशी बोलतांना त्या मुलीने सांगितले की, माझे नाव त्रिशा असून माझा बांगलादेश छात्र लीगशी संबंध नाही. अवंतिका अपूच्या मृत्यूनंतर कँडल मार्च काढण्यात आला त्याच वेळी मी त्या पथनाट्यात अभिनय केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माझ्या नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी मला फोन केला आणि घटनेचे तपशील विचारले. त्यांनादेखील हे अत्याचाराचे प्रकरण वाटले.

खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेएनयू शोर्ट स्टोरी नामक फेसबुक पेजने 26 जुलै रोजी हाच व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केले होते की, या व्हिडिओमधील मुलगी जगन्नाथ विद्यापीठाची विद्यार्थींनी असून या ठिकाणी अवंतिकाच्या आत्महत्येचा निषेध म्हणून पथनाट्य सादर करण्यात आले होते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील मुलगी हिंदू महिलांची दुर्दशा दाखवत नाही, तर अवंतिका नामक विद्यार्थींनीच्या आत्महत्येच्या निषेधार्थ जगन्नाथ विद्यापीठात पथनाट्य करत होती.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हात-पाय तोंड बांधून नाट्यमय निदर्शन करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ हिंदू महिलांची दुर्दशा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False