
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विरोधीपक्ष नेते राहुल गांधी झोपताना आणि भाजप नेते किरेन रिजिजू झोपणाऱ्या नेत्याची खिल्ली उडवताना दिसतात. दावा केला जात आहे की, राहुल गांधी संसदेत झोपले आणि त्यावर किरेन रिजिजू यांनी त्यांची खिल्ली उडवली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वेगवेगळ्या क्लिप जोडून तयार केला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप नेते किरेन रिजिजू म्हणतात की, “दादा, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की, सतत बोलू नका, तुम्हाला झोप येईल.”
एशियनेट न्यूज आणि विऑन न्यूजनेदेखील हाच व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये प्रश्न चिन्हाचा वापर करत लिहिले की, “राहुल गांधी लोकसभेत झोपलेले आढळले?”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “गुलामांचा प्रधानमंत्री संसदेत झोपा काढतो.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 सादर करतानाचा आहे.
एएनआयने 8 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या युट्यूब चॅनलवरुन या अधिवेशनाचे थेट प्रेक्षेपण केले होते.
संपूर्ण अधिवेशन पाहिल्यावर कळाले की, राहुल गांधी कथितरित्या झोपले म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि इतर भाजप नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली नव्हती.
व्हायरल क्लिपमधील वक्तव्या पूर्वी वरील व्हिडिओमध्ये 3:25:21 या वेळेवर किरेन रिजिजू विरोधकांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचे समर्थन करताना म्हणतात की, “राजकीय दबावाखाली सर्वजण (विरोधीपक्ष) याचा (वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचा) विरोध करत आहेत. पण आतून (गुप्तपणे) सर्वजण याला पाठिंबा देत आहेत. मला माहिती आहे. अध्यक्ष महोदय. राहुल गांधी नुकतेच बाहेर निघून गेले. पण त्यांनी मान्य केले आहे की, आपण जे म्हणत आहोत ते बरोबर आहे.”
पुढे, व्हिडिओमध्ये 4:01:13 वेळेवर किरेन रिजिजू विरोधकांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेचे विरोधर आणि वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचे समर्थन करत करताना दिसतात. या ठिकाणी रिजिजू बोलत असताना शेजारी बसलेले भाजप खासदार गिरीराज सिंह विरोधी पक्षाकडील एका सदस्याकडे बोट दाखवत ‘ते झोपी गेले आहे’ असा टोमणा मारतात.
पुढे रिजिजू थट्टा करत म्हणतात, “दादा, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की, सतत बोलू नका, तुम्हाला झोप येईल.”
तसेच, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील “जर भाषण चालू असेल तर तुम्ही सभागृहात झोपाल का?” अशी टिप्पणीदेखील केली.
परंतु, या प्रसंगी कॅमेरा एकदाही राहुल गांधी किंवा इतर विरोधी पक्ष नेत्यावर लक्ष केंद्रित करत नाही.
अधिक शोध घेतल्यावर या वरील व्हिडिओमध्ये 3:17:47 वेळेवर राहुल गांधी व्हायरल क्लिप प्रमाणे डोके बाजूला झुकलेले आणि हात बाकाच्या पाठीमागे ठेवून बसलेले दिसतात.
अर्थात व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधींची हिच क्लिप झूम करुन जोडल्या गेली आहे. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्या भाषणात सांगितल्या प्रमाणे राहुल गांधी व्हायरल व्हिडिओमधील प्रसंगाआधीच सभागृह सोडून गेले होते.
बातम्यामध्ये उल्लेख नाही
एएनआय, एनडीटीव्ही आणि द इंडियन एक्सप्रेस सारख्या वृतसंस्थांनी किरेन रिजिजू यांचा हाच व्हिडिओ शेअर करत बातमी दिली की, लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू एका खासदाराच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना भाजप नेत्यांना लक्षात आले की तेच खासदार झोपी गेले आहे. परंतु, संसदेच्या कामकाजाच्यादरम्यान राहुल गांधी झोपल्याचे आढळल्यावर किरेन रिजिजू किंवा भाजप नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली अशी बातमी कुठे ही आढळत नाही.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर लक्षात येईल की, राहुल गांधी दिसत असलेल्या डावीकडील फोटोमध्ये दुपारचे 2 वाजून 17 मिनिट वाजले आहे. तर उजवीकडील फोटोमध्ये जिथे रिजिजू आणि गिरीराज सिंह झोपलेल्या खासदाराकडे बोट दाखवतात तिथे 3 वाजून 01 मिनिट वाजले आहे.

किरण रिजिजू कोणाला बोलत होते?
पुढे, अधिक महितीसाठी फॅक्ट क्रेसेंडोने दिल्लीतील पत्रकारांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितल की, व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांच्या बेंचमधून तृणमूल काँग्रेसचे नेते सौगता रॉय यांनी किरण रिजिजू यांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर रिजिजू उत्तर देत असताना सौगता रॉय झोपले होते. लोकसभेतील वरिष्ठ नेते म्हणून रिजिजू यांनी त्यांना ‘दाद’ असे संबोधले.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मुळात किरण रिजिजू यांच्या भाषणादरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते सौगता रॉय झोपले होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधी सभागृहात झोपल्यावर किरेन रिजिजूने त्यांची खिल्ली उडवली नाही; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
