
इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोला या संघटनेच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यामध्ये संघटनेचा प्रमुख हसन नरसल्ला यांचा मृत्यू झाला.
याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका व्यक्तीचे जल्लोषात स्वागत होत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हेजबोला प्रमुखाला मारणाऱ्या पायलटचे इस्रायलमध्ये असे स्वागत झाले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओतील व्यक्ती पायलट नसून इस्रायलमधील लोकप्रिय गायक अविहू पिन्हासोव्ह आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये इस्रायलचा ध्वज घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे जल्लोषात स्वागत केले जाते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हेजबोला प्रमुख हासन नसरल्ला याला ज्या पायलट ने उडवलं त्याच इस्रायलमध्ये असे स्वागत केल.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे.
एका ट्विटर युजरने हाच व्हिडिओ 10 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर केला होता. कॅप्शनमध्ये या व्यक्तीचे नाव अविहू पिन्हासोव्ह असे म्हटले आहे.
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, व्हिडिओमधील व्यक्ती इस्रायली पॉप स्टार आहे.
ज्यू क्रॉनिकलच्या बातमीनुसार इस्रायलमध्ये युद्ध सुरू असताना लष्करी युनिटचे मनोबल वाढवण्यासाठी अविहू पिन्हासोव या पॉपस्टारला बोलविण्यात आले होते.
खालील फोटोमध्ये आपण व्हायरल व्हिडिओमधील स्क्रीनशॉट पाहू शकता.
तसेच द टेलिग्राफनेदेखील 17 नोव्हेंबर 2023 रोजी हाच व्हिडिओ शेअर करत माहिती दिली की, “उत्तर इस्रायलमधील इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या (आयडीएफ) राखीव सैनिकांच्या एका गटाला उद्धट वर्तनामुळे निलंबित करण्यात आले. पॉप स्टारने अविहू पिन्हासोव्ह सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी आणि सैनिकांनी असभ्य वर्तन केले असे वरिष्ठांनी म्हटले.”
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून त्यामधील व्यक्ती पायलट नाही. इस्रायली सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आलेल्या पॉप स्टार अविहू पिन्हासोव्हचे स्वागत झाले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:हेजबोला प्रमुखाचा खात्मा करणाऱ्या पायलटचे खरंच इस्रायलमध्ये असे स्वागत झाले का?
Written By: Sagar RawateResult: Misleading
