
पायाला प्लास्टर लावलेल्या 3 युवकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, व्हिडिओमधील मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलीची छेड काढल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अद्दल घडवली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा असून पोलिसांशी झालेल्या चकमकीदरम्यान हे तरुण जखमी झाले होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये पायाला प्लास्टर लावलेले 3 युवक जमिनीवर रांगताना दिसतात.
युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “सेहाब, अफजल आणि फैजल ! ही तीन उनाड गुंड मुस्लीम मुले ! उत्तर प्रदेशात राहतात ! एका हिंदू मुलीला, सायकल चालवताना अफजलने ओढले ! उरलेल्या दोघांनी त्या मुलीला बाईकने धडक दिली आणि तेथून पळ काढला ! या घटनेनंतर फक्त 24 तासातच योगीजींनी त्या तिघा गुंडांच्या पायात गोळ्या घातल्या !”
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे आढळले.
फर्स्ट इंडिया न्यूजने हाच व्हिडिओ 18 सप्टेंबर 2023 रोजी युट्यूबवर शेअर केला होती.
वरील संपूर्ण बातमी पाहिल्यावर कळते की, हा व्हिडिओ राजस्थानमधील भरतपूर भागातील आहे. या तरुणांवर खुनाचा आरोप होता आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हे जखमी झाले होते.
काय आहे संपूर्ण घटना ?
पूर्व राजस्थानमधील भरतपूर शहरात 27 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी अजय झमारी (23) नावाच्या तरुणाची अटलबंद पोलिस स्टेशन परिसराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या तीन गुन्हेगारांबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना घेरले. यादरम्यान आरोपींनी डीएसटी प्रभारी मुकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी आरोपींच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडल्या होत्या.
या तिन्ही जखमी आरोपींचे नाव तेजवीर, युवराज आणि बंटी खुशाल असून पोलिसांनी त्यांना आरबीएम रुग्णालयात दाखल केले होते. अधिक महिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
म्हणजे हे अरोपी मुस्लिम नव्हते.
दैनिक भास्करच्या बातमीमधील आरोपी तेजवीर, युवराज आणि बंटी खुशाल यांचे चेहरे दाखवण्यात आले आहेत.
खाली या फोटोंची तुलना व्हायरल व्हिडिओशी केल्यावर लक्षात येते की, तिन्ही आरोपी सारखेच दिसतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. मुळात व्हिडिओमधील तरुणांनी राजस्थानच्या भरतपूर येथे खून केला होता. पोलिसांशी झालेल्या चकमकीदरम्यान ते जखमी झाले होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राजस्थानमध्ये चकमकीत जखमी झालेल्या आरोपींचा व्हिडिओ खोट्या सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Misleading
