
गणपती विसर्जन मिरवणुकीवर दोन तरुणांनी दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दगडफेक करणारे हे दोन्ही तरुण मुस्लिम आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडातळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. दगडफेक करणारे दोन्ही तरुण हिंदू होते, तसेच वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला होता.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीवर दोन तरुण दगडफेक करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुस्लिम तरुण गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेक करत आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ही घटना कर्नाटकमध्ये घडली होती.
कन्नडा प्रभा वेबसाईटवरील 6 सप्टेंबर रोजीच्या बातमीनुसार, कर्नाटकमधील रायचूर शहरातील गंगा निवास रस्त्यावर ही घटना घडली होती. दगडफेक करणाऱ्या आरोपी तरुणांची नावे प्रशांत आणि प्रवीण आहेत. त्यांचे विनय आणि गणेश या दोघांशी पूर्वीपासून वैयक्तिक वाद होता. त्यातून त्यांनी त्या दोघांवर एका दुकानावर चढून दगडफेक केली होती. यामध्ये विनय आणि गणेश जखमी झाले होती.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रशांत आणि प्रवीण यांना अटक केली असून त्यांनी कबुली
दिली की, जून्या भांडणातून त्यांनी दगडफेक केली होती. यामध्ये कोणतेही धार्मिक कारण अथवा हेतू नव्हता.

मूळ पोस्ट – कनडाप्रभा
पोलिसांचे खंडण
पुढे अधिक महितीसाठी सदर बाजार स्टेशनशी संपर्क साधल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. या घटनेमध्ये सहभागी असलेले दोन्ही गट हिंदू आहेत. गंगा निवास रस्त्याजवळ 1 सप्टेंबर रोजी प्रशांत व प्रवीण नामक आरोपींनी गणपती विसर्जन मिरवणुकीतील दोन तरुणांवर करुन दगडफेक केली. सध्या या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलेली आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. दगडफेक करणारे दोन्ही तरुण मुस्लिम नव्हते. वैयक्तिक कारणाने दोन हिंदू गटांमध्ये हा संघर्ष झाला होता. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:विसर्जन मिरवणुकीत दगडफेक करणारे ते तरुण मुस्लिम नव्हते; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading


