बांगलादेशमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील संघर्षाचा व्हिडिओ सांप्रदायिक रंग देऊन व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

सध्या सोशल मीडियावर एका महाविद्यालयात काही लोकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

दावा केला जात आहे की, “बांगलादेशमध्ये महाविद्यालयातील हिंदू विद्यार्थांवर हल्ला करण्यात आला आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मारहाण सांप्रदायिक कारणास्तव झाली नव्हती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. महबुबुर रहमान मोल्ला कॉलेज या महाविद्यालयाच्या आवारात काही तरुण लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण करताना दिसतात. 

हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “संपूर्ण बांगला देशात मुस्लिम समुदाय कडून निरागस हिंदूंचा नरसंहार सुरूच आहे. कॉलेजच्या आवारात हिंदूंची कत्तल.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओच्या शेवटी “bdnews24” चे लोगो दिसते.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, bdnews24 ने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ 25 नोव्हेंबर रोजी अपलोड केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “विद्यार्थी हाणामारीवरून मोल्ला कॉलेजमध्ये लुटमार.”

प्रथमआलोने 25 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या बातमीनुसार  डॉ महबुबुर रहमान मोल्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ढाका नॅशनल मेडिकल कॉलेज आणि शहीद सुहरावर्दी कॉलेज कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि लूटमार केली. ढाका नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये चुकीच्या उपचारांमुळे अविजित हवालादर नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा दावा महबुबुर रहमान मोल्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. साक्षीदारांनी सांगितले की कालच्या हल्ल्याचा बदला म्हणून डॉ महबुबुर रहमान मोल्ला कॉलेजवर हल्ला झाला.

मूळ पोस्ट – प्रथमआलो | आर्काइव्ह

डेली सनच्या वृत्तानुसार ‘सुपर संडे’ नावाच्या कॉलेजवर रविवारी झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी ‘सरकारी कबी नजरुल कॉलेज’ आणि ‘सरकारी शहीद सुहरावर्दी कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी डेमरा येथील डॉ. महबुबुर रहमान मोल्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले.

कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) च्या सहा पलटणांना त्या भागात तैनात करण्यात आले. तसेच दोन्ही महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली.

ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी (डीएमपी) सांगितले की, परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी हल्लेखोरांविरुद्ध जास्त शक्ती वापरणे करणे टाळले.

मूळ पोस्ट – डेली सन | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. बांगलादेशमध्ये विद्यार्थांच्या मारहाणीच्या या व्हिडिओमध्ये कोणतेही सांप्रदायिक कारण नाही. सांप्रदायिक रंग देऊन हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:बांगलादेशमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील संघर्षाचा व्हिडिओ सांप्रदायिक रंग देऊन व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading