
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक केशरी रंगाची साडी घातलेल्या महिलेसोबत पोलिस वाद घालतात आणि तिला मंदिरात जाण्यापासून रोखतात.
दावा केला जात आहे की, महिलेने केशरी रंगाची साडी घातल्या कारणाने कर्नाटक पोलिस तिला मंदिराच्या बाहेर काढतात.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. कर्णाटक पोलिसांनी महिलेला निदर्शक समजून अटक करण्याचा प्रयत्न केला होता.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, पोलिस केशरी रंगाची साडी घातलेल्या महिलेला मंदिरात जाण्यापासून रोखतात. वाद निर्माण झाल्यावर पोलिस त्या महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात घटाना स्थळी महिलेचा नवरा आल्याने तिला सोडले जाते आणि या सर्व प्रकारामुळे महिलेला रडू कोसळते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “एक हिंदू महिला केशरी रंगाची साडी नेसून मंदिरात आली म्हणुन तिचे अटकेचा प्रयत्न करणारे कर्नाटक पोलिस — नंतर त्या महिलेला धक्के मारुन मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात आले. कर्नाटक काँग्रेस शासित राज्य आहे बरं का गांधी गुलामांनो.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, पोलिसांनी महिलेला मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे कारण दुसरे होते.
टीव्ही-9 कन्नड न्यूज चॅनलने 9 सप्टेंबर रोजी हाच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिहिले की, चामुंडी चलोला परवानगी नाकारल्याचा मुद्दा. केशरी रंगाची साडी घातलेली महिलेला आपल्या मुलीच्या नोकरीसाठी चामुंडेश्वरी मंदिरात नवस बोलण्यासाठी गेली होती. परंतु, पोलिसांनी तिला अडवले आणि मंदिरात जाण्यापासून रोखले.
काय आहे हे प्रकरण ?
सदरील महितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर कळाले की, हा सर्व ड्रामा ‘चामुंडी चलो’ निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर झाला होता.
कन्नड प्रभाच्या बातमीनुसार, दरवर्षी प्रमाणे यंदाही मैसूरच्या चामुंडी टेकडीवर 22 सप्टेंबर रोजी दसरा उत्सव आयोजित करण्यात आले. या महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्तक यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, डीसीएम शिवकुमार म्हणाले की, मैसूरची चामुंडी टेकडी ही केवळ हिंदूंची मालमत्ता नाही. या विधानाच्या विरोधात, हिंदू जागरणा फोरमने ‘चामुंडी टेकडी चलो’ हा निषेध मोर्चा काढला होता. अधिक महिती येथे वाचू शकता.
चामुंडी टेकडीवर ‘चामुंडी टेकडी चलो’ निषेध मोर्चा चालू असताना पोलिसांनी चुकून एका दांपत्याला अटक केली होती. परंतु, ते निषेध मोर्चाचा भाग नसल्याचे कळताच पोलिसांनी त्यांना सोडले. घडलेल्या प्रकारामुळे महिलेला रडू कोसळले आणि दांपत्य मंदिरात दर्शन न करताच परतले.
अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेला केशरी रंगाची साडी घातल्यामुळे कर्नाटक पोलिसांनी मंदिरा बाहेर काढली नाही. मुळात पोलिसांनी महिलेला ‘चामुंडी टेकडी चलो’ निषेध मोर्चात सहभागी असल्याचे समजून अटक केले. गैरसमज दूर झाल्यावर महिलेला सोडण्यात आले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:केशरी रंगाची साडी घातली म्हणून कर्नाटक पोलिसांना महिलेला मंदिराबाहेर काढले का? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
