
एका वृद्ध महिलेले राम मंदिराला तब्बल 51 लाख रुपयांचे दान दिले, या दाव्यासह पिवळ्या साडीतील एका ज्येष्ठ महिलेचा फोटो व्हायरल होत आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील ज्येष्ठ महिलेने राम मंदिराला नाहीतर 6 वर्षांपूर्वी वृंदावनातील एक गोशाळा बांधण्यासाठी देणगी दिली होती.
काय आहे दावा ?
युजर्स ज्येष्ठ महिलेचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “जेंव्हा ह्या यशोदाआईला श्रीराम मंदिराच्या निर्माणाची बातमी समजली, तेंव्हा ह्या शबरी मातेने आपल्या रामलल्लाच्या मंदिराला रु.51,10,025/- समर्पित केले.!”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज द्वारे सर्च केल्यावर हाच व्हायरल फोटो ‘श्री बांके बिहारी जी वृंदावन’ नामक फेसबुक पेजवर 22 मे 2017 रोजी शेअर केलेला आढळला. कॅप्शनमध्ये लिहिले की, “बिहारी मंदिराबाहेर बसलेल्या या महिलेने गेल्या 30 वर्षात 5,10,25,50 रुपये जमा करून केले आणि त्या रोख रक्कमेतील 40 लाख रुपये गोशाळा आणि धर्मशाळा बांधण्यासाठी दान दिले.”
टाइम्स ऑफ इंडियाने 26 मे 2017 रोजी याबाबत बातमी प्रकाशित केली होती. फुलवती नामक 70 वर्षीय महिलेने जन्मभर साठवलेली रोख रक्कम आणि मालमत्ता विकून एकून जमवलेले 40 लाख रुपये वृंदावनमध्ये गोशाळा आणि धर्मशाळा बांधण्यासाठी दान केले.
ही बातमी व्हायरल झाल्यानंतर एबीपी न्यूज चॅनलने वृंदावनमधील ‘श्री बांके बिहारी जी’ मंदिराला भेट देऊन दान देणाऱ्या महिलेचा शोध घेतला. त्या महिलेचे नाव यशोदा असून ती मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर कटनी शहराची रहिवासी आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्या वृंदावनमध्ये आल्या. आपले कटनीमधील घर विकून मिळाल्या 45 लाख रुपयातील 15 लाख रुपये त्यांनी गोशाळा आणि एका हॉलसाठी दान केले होते.
एबीपी न्यूजने ज्येष्ठ महिला यशोदची घेतलेली मुलाखत येथे पाहू शकता.
राम मंदिर दान
द टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार अयोध्येतील राम मंदिराला भाविकांनी ऑनलाइन देणगीद्वारे तब्बल 3.17 कोटी दान मिळाले दिले आणि महाराष्ट्रातील भाविकांनी 80 किलो वजनाची सोने आणि पितळ्याची तलवार ट्रस्टला दान करण्यात आली होती.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील ज्येष्ठ महिलेने राम मंदिराला नाहीतर 6 वर्षांपूर्वी वृंदावनातील एक गोशाळा बांधण्यासाठी देणगी दिली होती. भ्रामक दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:व्हायरल फोटोमधील महिलेने राम मंदिराला नाही, तर वृंदावनातील गोशाळेला देणगी दिली; वाचा
Written By: Sagar RawateResult: Misleading
